अमरावती विद्यापीठाचे 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स' विकसित:7.3 कोटींच्या प्रकल्पात यश, कुलगुरूंच्या हस्ते संशोधकांचा सत्कार




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग तसेच पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ७.३ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत ‘प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स’ (औषधी वनस्पतींमधील प्रमाणित मेटाबोलाइट्स) विकसित करण्यात आले आहेत. या संशोधनामुळे विद्यापीठातील गुणवत्तावाढ ठसठशीतपणे समोर आली आहे. या यशाबद्दल योगदान देणाऱ्या संशोधकांचा कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनर्मित वनस्पती संदर्भ मानकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. प्रशांत ठाकरे, सुदर्शन कोवे, अनघा अंडरवाडे, जितेन्द्र ठाकूर यांच्यासह सर्व पीएच.डी. संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील यांच्या नेतृत्वात हे संशोधन पथक कार्यरत होते. संशोधन पथकातील डॉ. हरिप्रसाद पैकराओ, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अंकित काळे तसेच प्रकल्प सहकारी ज्ञानेश्वरी चोखट आणि पल्लवी मरकाम यांनी अत्यंत कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध औषधी वनस्पतींमधून महत्त्वाची मानके यशस्वीपणे वेगळी केली आहेत. यामध्ये पुनर्नवा, बोएराव्हिनोन बी आणि युपॅलिटिन गोखुरू, हार्मिन, प्रोटोडिओस्सिन, अश्वगंधा, विथेफेरिन ए यांसारख्या मानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती मानकांचे विलगीकरण व निष्कर्षण करण्यात आले आहे. विकसित केलेले हे तंत्रज्ञान राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग तसेच आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करून उद्योग क्षेत्राला हस्तांतरित केले जाऊ शकते. यामुळे व्यावसायिक आणि औषध निर्माण क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *