मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला आग:विषारी धुराने विद्यार्थी रुग्णालयात, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू




लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात विषारी धुराचे मोठे लोट पसरले. श्वसनाचा त्रास झाल्याने एमआयटी शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले. अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न शनिवारीही सुरू होते. एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या देश-विदेशातील सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५ हजार विद्यार्थी आणि एक हजार कर्मचारी संकुलाच्या परिसरात राहतात. शुक्रवारी दिवसभर प्रयत्न करूनही आग विझवता न आल्याने रात्री ती आणखी वाढली. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि घसा बसणे असे त्रास झाले. विषारी धुरामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने काही विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्री तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी वायूच्या लोटांमुळे परिसरातील दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. याचा परिणाम शनिवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवरही झाला. तसेच, या धुरामुळे परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना शनिवारी सुट्टी द्यावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोणी-काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पोलिस पाटील आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. या ग्रामपंचायतींमध्ये कचरा संकलनासाठी जागा किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट मुळा-मुठा नदीपात्रात टाकला जातो. परिणामी, नदीपात्रात आता कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. घाणीचे साम्राज्य पसरलेल्या या ठिकाणी कचऱ्याला सातत्याने आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे वायुप्रदूषणातही कमालीची वाढ झाली असून परिसरातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर जलप्रदूषणही वाढत असून मुळा-मुठा नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *