'डिजिटल अरेस्ट'ने ज्येष्ठाची 10.74 कोटींची फसवणूक:दोन आरोपी जेरबंद, पुणे सायबर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून केली अटक




पुणे सायबर पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आले आहे की, अज्ञात आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी भासवले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवली. त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडल्याचे आणि त्यावर फसवणुकीच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांना अटक करण्याची धमकी देऊन, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी सर्व गुंतवणूक आरोपींनी दिलेल्या खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. या धमक्यांना घाबरून फिर्यादीने विविध बँक खात्यांवर मोठी रक्कम जमा केली. यामुळे त्यांची एकूण १०.७४ कोटी रुपयांची फसवणूक झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला. यामध्ये संबंधित खात्यांमधून एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत हर्षद सुभाष धनतोले (वय २३) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे सध्या कर्वेनगर, पुणे येथे राहत असले तरी, ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. आरोपींकडून फसवणुकीतील ४० लाख रुपये गोठवण्यात आले असून, ४ लाख ७८ हजार ५०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. सायबर पोलिस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे ‘डिजिटल अरेस्ट’च्या वाढत्या प्रकारांविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *