![]()
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरुष पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह यांनी जागतिक पाणी संकटावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धाचे वातावरण असून, त्यामुळे स्थलांतर आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्याचा विचार करून पाणी संकटावर तातडीने मार्ग काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. ते पुणे येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे आयोजित दोन दिवसीय ग्रीन एक्स्पो २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात शनिवारी या तिसऱ्या ग्रीन एक्स्पोला सुरुवात झाली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सिंह यांनी यावेळी नदीला पृथ्वीवरील प्रमुख घटक संबोधत तिच्याशी छेडछाड न करण्याचे आवाहन केले. पाणी हे ब्रह्म असून त्याचे महत्त्व मोठे आहे, असे ते म्हणाले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत युद्धांमुळे होणारे स्थलांतर आणि रोजगाराची धडपड सुरू असतानाच, पाणी संकट अधिक कठीण होत चालले आहे, यावर काम करणे मोठे आव्हान आहे. भारतात अनेक ठिकाणी भूजल पातळी खालावत असून, ही चिंतेची बाब आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करताना शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, नीर, नारी आणि नदी या तीन गोष्टींना महत्त्व देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पर्यावरण क्षेत्रात शाश्वत विकासाचे काम करताना त्यात संवेदना असणे महत्त्वाचे आहे. यामुळे पर्यावरण विकासाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना डोळे आणि हृदयाने त्याच्याशी जोडले जाण्याची गरज आहे, असे डॉ. सिंह म्हणाले. यामुळे ग्रीन सोसायटी, ग्रीन स्कूल यांसारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील. कोणत्याही नव्या कामामध्ये पुणे हे देशात पहिल्या क्रमांकावर असते, असेही डॉ. राजेंद्र सिंह यांनी नमूद केले. पूर्वी रेल्वेने जाताना चंबळचे खोरे आले कि, रेल्वेमध्ये खिडक्या लावा, चंबळ आले आहे, असे ओरडून संगितले जायचे. सध्या इथे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या भागातील ६३३२ डाकूंनी हातातील बंदूक टाकून देत या भागातील नद्या जिंवत करण्याचे काम केले आहे, त्यामुळे इथे पाणी आले असून हे लोक उत्तम प्रकारे शेती करत असल्याची आठवण डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितली. पर्यावरण क्षेत्रात येत असणारे नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होत असल्याचे रोटरीचे संचालक संतोष मराठे यावेळी म्हणाले. रोटरी ग्रीन एक्स्पो हे शाश्वतता-केंद्रित, शाश्वतता या संकल्पनेवर आधारित व्यासपीठ असून यामध्ये एकाच छताखाली नागरिकांना त्यांच्या घरासाठी, कामाच्या ठिकाणी आणि समाजासाठी राबविण्यात येऊ शकणाऱ्या शाश्वतता विषयक उपायांची व उपक्रमांची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेण्यासोबतच त्यांचा सक्षम अवलंब कशा पद्धतीने करायचा यासंदर्भात देखील मार्गदर्शन मिळू शकेल असेही मराठे यांनी नमूद केले.
जागतिक पाणी संकट गंभीर, मार्ग काढण्याची गरज:ग्रीन एक्स्पोमध्ये जलपुरुष आणि पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
