वन्यजीव अपघात रोखण्यासाठी अमरावतीत अनोखा उपक्रम:अपघातप्रवण रस्त्यांवर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली
![]()
अमरावती महानगरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वन्यप्राण्यांची वर्दळ असते, ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाईल्डलाईफ रेस्क्यू फाऊंडेशन आणि बिगकास्ट कन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया या संस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. अपघातप्रवण स्थळांवर रस्त्यांवर पट्टे आखून त्यावर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अमरावतीमधून चांदूर रेल्वे, नागपूर, मोर्शी आणि यवतमाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वळणांवर रात्री उशिरा रोही, हरिण, काळवीट, नीलगाय, चितळ आणि बिबट यांसारख्या प्राण्यांची ये-जा असते. या वळणांवर चढ-उतार असल्याने वाहनांची गती वेळेवर नियंत्रित होत नाही, परिणामी यापूर्वी अनेक प्राण्यांचे अपघात झाले आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी हा चित्रकला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत अमरावतीतील रस्त्यांवर वन्यप्राणी-वाहन अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढती वाहतूक, रस्त्यांचे जाळे आणि वन्यजीवांच्या अधिवासांचे तुकडीकरण यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या अपघातांमध्ये बिबट्या, चितळ, काळवीट आणि नीलगाय यांसारख्या अनुसूची-१ (शेड्युल वन) प्रजातींचा मृत्यू झाला आहे, जी जैवविविधतेसाठी चिंताजनक बाब आहे. हे अपघात प्रामुख्याने वन्यजीव कॉरिडॉरमध्ये घडले आहेत, जे वन्यप्राण्यांच्या स्थलांतरासाठी आणि हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय मार्ग आहेत. या भागांमधून वेगाने जाणारी वाहने प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करतात आणि अपघातांची शक्यता वाढवतात. या समस्येवर उपाय म्हणून, दोन्ही संस्थांनी व्यवहारशास्त्र आणि दृश्य ग्रहणशक्तीचा वापर करून रस्त्यावर आकर्षक वन्यजीव चित्रकला रेखाटली आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे रस्ते सुरक्षिततेसोबतच पर्यावरण संवर्धनाबद्दलही जागरूकता वाढत आहे. या मोहिमेत कुणाल दातेराव, बबलू बोबडे, अमीन गुडे, जिया बुगदादी, सुमेध गवई, अमित मोटीवाला, मेहुल रायचंद, नरेश पाठाडे, आकाश हरले आणि प्रसाद वानखेडे या तरुणांनी सहभाग घेतला आहे.
