जिल्हा परिषदेत कर्मचारी संघटनेने उघडली पाणपोई:सीईओ सत्यम गांधी यांच्या हस्ते उद्घटन, ग्रामीण जनतेला शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होणार
![]()
ग्रामीण भागातून अमरावती जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी कर्मचारी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा उपक्रमांमुळे संघटनेची ताकद व बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून ‘पानेरी’ नावाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा देणारा नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यांच्या मते, ‘पानेरी’ हा उपक्रम माणुसकीची परंपरा जपणारा आणि समाजसेवेचा एक आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे, २०१३ पासून सुरू असलेला हा ‘पानेरी’ उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून, तो आता एक प्रेरणादायी परंपरा बनला आहे. या माध्यमातून कर्मचारी वर्ग आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीलाही दरवर्षी कर्मचारी संघटनेतर्फे अमरावतीकरांना फराळाचे वितरण केले जाते. या उपक्रमाच्या यशासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. यावेळी निलेश तालन, ज्ञानेश्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, विजय कोठाळे, मंगेश मानकर, नितीन माहोरे, संजय मुंद्रे, अर्पणा आत्राम, जीवन नारे, परमेश्वर राठोड, सतीश पवार, राहुल रायबोले, स्वप्निल कुरेकर, आदित्य तायडे, प्रमिलाताई उंबरकर, दिनेश खंडारे, विजय काळे, निशांत तायडे, अशोक धोटे, उत्तम डोंगरे, गजानन इंगळे, चांदुरे आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
