प्रो. शंकर बुंदेले यांना सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य पुरस्कार:दिल्ली येथील ज्योतिष स्टार संस्थेकडून सन्मानित
![]()
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांना ‘सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील ‘ज्योतिष स्टार संस्थान’ने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात देण्यात आला. विख्यात ज्योतिषाचार्य अनिल वत्स यांच्या हस्ते प्रोफेसर बुंदेले यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या अधिवेशनाला जगभरातील अनेक ज्योतिषाचार्य उपस्थित होते. या अधिवेशनात प्रोफेसर बुंदेले यांनी ‘जन्मकुंडली के विश्लेषण में नवमांश एवं अन्य वर्ग फलित कुंडलियों की भूमिका’ या विषयावर आपले संशोधन सादर केले. ज्योतिष विज्ञान हा एक स्वतंत्र विषय असून, मानवी जीवनाचे विविध पैलू समजून घेतल्यानंतर फलज्योतिष ठरविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले. प्रमुख अतिथी अनिल वत्स यांनी प्रोफेसर बुंदेले यांच्या शोधनिबंधावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बुंदेले यांनी मांडलेले ज्योतिषीय सूत्र विज्ञाननिष्ठ आहे. त्यांच्या या परिश्रमाचे वत्स यांनी कौतुक केले. या यशाबद्दल प्रेमचंद बिजोरे आणि रामदास नोटावाले यांच्यासह अनेकांनी प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांचे अभिनंदन केले आहे.
