देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन
![]()
विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या विभागीय अध्यक्ष डॉ. मीनल भोंडे यांच्या हस्ते झाले. सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजिंग, पुणे येथील डॉ. भूषण बोरोटीकर हे बीजभाषक म्हणून उपस्थित होते. डॉ. भूषण बोरोटीकर यांनी संशोधनातील गुणवत्ता, प्रामाणिकता, चौर्यकर्म (प्लॅजिअरिझम) नियंत्रण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन निकष यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. मीनल भोंडे यांनी संशोधन संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शकांची आणि संशोधकांची जबाबदारी अधोरेखित केली. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता व पारदर्शकता अधिक प्रभावी व्हावी आणि संशोधन व्यावसायभिमुख व समाजाभिमुख व्हावे, यासाठी सर्व मार्गदर्शकांनी जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनानंतरच्या दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख होत्या. संशोधक आणि मार्गदर्शक नियमावलींचा अभ्यास करून संशोधन आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. संदीप वाघुळे, विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ. हेमंत चांडक, अ.भा. शैक्षिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश मुंदे यांचीही उपस्थिती होती. पॅनेल चर्चेदरम्यान संशोधन गुणवत्ता, मार्गदर्शक-विद्यार्थी संबंध, प्रकाशन प्रक्रिया व संशोधनातील नैतिकता या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. समारोप सत्राला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि उपकुलसचिव डॉ. मीनल मालधुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. मंगेश अडगोकार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. संदीप वाघुळे यांनी आय.क्यू.ए.सी.ची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वि. रा. मांडवकर यांनी केले, तर डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी आभार मानले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या सर्व अध्यक्ष, महामंत्री, महिला प्रमुख, सहप्रमुख तसेच अभ्यास मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेला विविध विद्याशाखांमधील संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक आणि पीएच.डी. संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
