अमरावतीत चाकूने रील्स बनवणाऱ्या दोघांवर गुन्हा:पोलिसांनी शस्त्रांसह अटक करत आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला

0
829cf1d8-35e3-47a7-8291-381814ad23de_1772036290494.jpg




अमरावती येथे हातात चाकू घेऊन रील्स तयार करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शस्त्रांसह अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त सूत्रांकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. संबंधित तरुण मागील काही दिवसांपासून घातक शस्त्रे हातात घेऊन रील्स तयार करून समाज माध्यमांवर अपलोड करत होते. बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी ते वडाळी गार्डन परिसरात पुन्हा शस्त्रांसह रील तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचला. या कारवाईदरम्यान लोकेश राजेश वाटकर (१९, रा. दत्तवाडी, महाजनपुरा) आणि राम राजू तायडे (२१, रा. कुंभारवाडा, खोलापुरी गेट परिसर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा चायना चाकू जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध आर्म ॲक्टच्या कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed