राहुल गांधींवरील हक्कभंग नोटीस लोकशाही दडपण्याचा प्रयत्न:काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका; NEET पेपरफुटीशी संबंध जोडला




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली हक्कभंगाची नोटीस ही लोकशाहीची गळचेपी करण्याचा आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सरकार अडचणीत आल्यानंतर सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, नीट पेपरफुटी घोटाळ्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकरणातील त्रुटी दूर करून परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याऐवजी सरकार केवळ शिक्षेच्या तरतुदी अधिक कठोर करण्यावर भर देत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाई, लाठीहल्ले, पेलेट गनचा वापर आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाबाबत केंद्र सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेला सामोरे जाऊन या प्रश्नांवर उत्तर देणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे तिवारी म्हणाले. मात्र, संसदेत चर्चा टाळून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणे हे कर्तव्यापासून पळ काढण्यासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी संसदेत विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाच्या आधारे सामाजिक वास्तव मांडले असून, त्यांनी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर संसदीय नियम ३५२ अंतर्गत हक्कभंगाचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा तिवारी यांनी केला. सरकारला हे वक्तव्य खटकत असल्यास त्यामागे विरोधकांचा आवाज दाबण्याची मानसिकता असल्याचेही त्यांनी म्हटले. भाजपने काँग्रेसला संसदीय भाषेचे धडे देऊ नयेत, कारण भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांविषयी अवमानकारक शब्दांचा वापर केला असून त्यातील काही शब्द संसदीय कामकाजातून वगळण्यात आले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. राहुल गांधी यांच्यावरील हक्कभंगाची नोटीस विशेषाधिकार समितीकडे गेली तरी काँग्रेस विद्यार्थी, तरुण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडेल. भाजप कितीही दबाव आणला तरी संसदेत जनतेचा आवाज उठवणे काँग्रेस थांबवणार नाही, तसेच या प्रकरणामुळे भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा उघड झाला असल्याचा दावा तिवारी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *