![]()
पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रथमच पुणे शहराला भेट दिली. मागील आठवड्यात त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस भवनवर भाजपने हिंसक मोर्चा काढून दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस करून सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनीही प्रदेशाध्यक्षांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजकीय टिप्पणी आणि सूड घेण्यासाठी खोटे बोलतात, याची मला लाज वाटते,” असे सपकाळ म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटे बोलण्याचे पातक फडणवीस करत असतील, तर त्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ यांनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. “पुण्यात असलेल्या केंद्रातील एका मंत्र्याने आमच्या मेळाव्याची माहिती मिळताच सर्व बैठका रद्द केल्या आणि १०-१० मिनिटाला माहिती घेत होते. यावरून पुणे शहर काँग्रेसच्या मेळाव्याचा धसका भाजप नेत्यांनी घेतल्याचे दिसते,” असे ते म्हणाले. “पुण्याच्या पावन भूमीत इतिहासात गाढवाचा नांगर फिरवण्याचे पातक झाले होते. याच मनुवादी विचारांचा माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे,” अशी टीका त्यांनी केली. सपकाळ पुढे म्हणाले की, “मनुवृत्ती म्हणजे गाढवाचा नांगर, तर संविधान म्हणजे सोन्याचा नांगर आहे.” येणाऱ्या काळात स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांनी त्यांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले. नव्या परिवर्तनाची सुरुवात पुण्यातून झाली असून, ती पुढे घेऊन जायची आहे, असे सपकाळ यांनी नमूद केले.
पुणे काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे लढण्यासाठी बळ मिळाले: सपकाळ:प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा
