![]()
महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेतली. यावेळी तिघांची कमराबंद चर्चा झाल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. त्यामुळे भाजपला सोबत घेतले जाणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी मित्र पक्षांना टार्गेट केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात तर भाजप नेत्यांनी टोकाची टीका केल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नाराज आहेत. निकालात भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. तरी देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचे सांगत आव्हान देत आहेत. मंत्री देसाई-पाटलांचा जयकुमार गोरेंवर रोष साताऱ्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षात भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र समंजस्यपणा दाखवला. परंतु, मंत्री जयकुमार गोरे अजूनही आव्हानाचीच भाषा करत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती एकनाथ शिंदेंना दिली. तसेच भाजपला सत्तेत बरोबर घेण्यास शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांचा विरोधच आहे. दोन्ही नेत्यांचा रोष हा मंत्री गोरे यांच्यावरच आहे. सातारा जिल्हा परिषदेतील बलाबल जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेनेला १५ जागा, राष्ट्रीय काँग्रेसला १, स्वाभिमानी शेतकरी संघटना (राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत) १ आणि अपक्ष १, अशा जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारा ३३ हा आकडा कुणालाच गाठता आला नाही. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या सदस्यांची कायदेशीर गटनोंदणी केली. काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सहयोगी गट म्हणून पाठिंबा दिला आहे. गट नोंदणी नंतर दोन्ही पक्षांचे सदस्य टूरवर गेले आहेत.
सातारा झेडपीतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार?:जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत
