![]()
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, या कुंभमेळ्यासाठी सरकारने 32 हजार कोटी दिलेत. तसेचया सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे मुंबईत आयोजित ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’ मध्ये ते बोलत होते. मी पहिल्यांदा असा आगळावेगळा कॉन्क्लेव्ह पाहतोय. संस्कृती जपणारेच असे उपक्रम राबवतात, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी दिव्य मराठीच्या सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे कौतुक केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नाशिकचा ब्रँड अधिक भक्कम करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने शुक्रवारी मुंबईत ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’चे पार पडला. भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. असा कॉन्क्लेव्ह पहिल्यांदाच पाहिला एकनाथ शिंदे म्हणाले, “मी अनेक कॉन्क्लेव्हला जात असतो. इंडस्ट्री, इन्फ्रा, डेव्हलपमेंट, पर्यावरण असे अनेक कॉन्क्लेव्ह असतात. पण इथे पहिल्यांदा आगळावेगळा कॉन्क्लेव्ह बघतोय सिंहस्थ कॉन्क्लेव्ह. ठाण्यातील कार्यक्रम करून पुण्याला जाणार होतो. पण उदय सामंत यांनी फोन करून इकडे वेगळा कॉन्क्लेव्ह असल्याचे सांगितले. आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले धार्मिक अधिष्ठाण या सगळ्याबद्दल ज्याला आस्था असते, तेच अशाप्रकारचे कॉन्क्लेव्ह करतात. दिव्य मराठीने बातम्यापुरते मर्यादित न राहता, अशाप्रकारचा आगळावेगळा सिंहस्थ कॉन्क्लेव्ह आयोजित केल्याबद्दल मी दिव्य मराठीला मनापासून धन्यवाद देतो.” सत्य सांगू बिंधास्त ही माझीच टॅगलाईन एकनाथ शिंदे म्हणाले, “दिव्य मराठीने हा कॉन्क्लेव्ह घेऊन दिव्य काम केलेले आहे. सिंहस्थ हा १२ वर्षांनी आपल्या नाशिकमध्ये होतोय, हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. असा विषय घेऊन दिव्य मराठीने सिंहस्थ कॉन्क्लेव्ह आयोजित केलाय. त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. दिव्य मराठीची सत्य सांगू बिंधास्त ही माझीच टॅगलाईन आहे. खरं आहे ते बिंधास्त सांगायचं, कधीही लपवायचे नाही. खरं बोललो की आपल्याला कुणाशी काय बोललो ते आठवावे लागत नाही. नेहमी खरे, सत्य आणि बिंधास्त बोललो, तर आपण कुठे अडचणीत येत नाही.” प्रयागराज कुंभमेळा मॉडेलचा अभ्यास एकनाथ शिंदे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी अधिकारी, प्रशासन आणि पूर्ण सरकार आहे. सध्या कुंभमेळा आयोजनाचे नियोजन सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना आपण पहिल्यांदा प्राथमिक बैठक घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अनेक बैठका घेतल्या. मी एकदा नाशिकला देखील नगरविकास विभागाची बैठक घेतली. त्यावेळी प्रयागराजचा कुंभ सुरू होता. प्रयागराजच्या कुंभची व्यवस्था आणि नियोजन आपण प्रत्यक्ष पाहिले पाहिजे, असे मी तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी देखील मी फोनवरून संपर्क साधला. आपले अधिकारी देखील तिकडे जाऊन, तेथील कुंभची तयार पाहुन आले. आपल्या राज्यात कुंभमेळा असल्याने आपण भाग्यवान एकनाथ शिंदे म्हणाले, नाशिकमधील कुंभ सिंहस्थ कुंभ आहे. आपले राज्य भाग्यवान आहे. आपण नशीबवान आहोत की, आपल्या राज्यात नाशिकमध्ये हा कुंभ होत आहे. देशभरातील सगळे लोक त्याठिकाणी येतील. त्यांची गैरसोय होऊ नये, याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. पाऊस नसताना आणि पाऊस असताना आपल्याला वेगवेगळी तयारी करावी लागते. ही सगळी तयारी प्रशासनातील सर्व यंत्रणा करत आहेत. या कुंभमेळ्यासाठी ज्यांना जी जबाबदारी दिली जाईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम सरकार म्हणून आपण करू. नाशिकचे प्रशासन देखील सज्ज आहे. नाशिक प्रशासनाने सर्व नियोजनाची तयारी पूर्णपणे केलेली आहे. ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्यावर भर एकनाथ शिंदे म्हणाले, या सिंहस्थ कुंभाला पैसे कमी पडणार नाहीत, याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. जवळपास ३२ हजार कोटी रुपये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देण्यात आलेले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२६ ध्वजारोहणाने या कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. २२ महिने चालणारा हा त्रिखंडी कुंभमेळा आहे. पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी होईल. हा सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर भारताच्या अध्यात्माची, संस्कृतीची आणि सनातन परंपरेची जगासमोरची ही भव्य ओळख ठरेल. दिव्य मराठीचे काम दिव्यत्वाची प्रचिती आणण्याचे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही भूमी भगवान शंकर, प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आणि गोदावरीच्या उगमाने धन्य झालेली भूमी आहे. या भूमीची सेवा करण्याची संधी आमच्या सरकारला आणि आपण सर्वांना मिळालेली आहे. असे अलौकिक कार्य करून, दिव्यत्वाची प्रचिती आणण्याचे काम दिव्य मराठीने केलेले आहे. एआयच्या मदतीने आधुनिक कुंभमेळा नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपण पूर्णपणे दीर्घकालीन विकास प्रकल्प, सर्व यंत्रणा तयार केलेल्या आहेत. स्वतंत्र प्राधिकरण आणि कायदा तयार केलेला आहे. स्वतंत्र निधीचे नियोजन केलेले आहे. स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये एआयचा वापर करण्यात येणार आहे. हा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जे जे काही नियोजन आवश्यक आहे, ते आपण करतोय. १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज या सिंहस्थ कुंभमेळ्याला अंदाज घेतल्याप्रमाणे १२ कोटी भाविक येतील. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. आपल्याकडे प्रयागराज एवढी मोठी जागा नाहीये. त्यामुळे आपल्याला कमी जागेमध्ये नियोजन करायचे आहे. हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे.
दिव्य मराठीच्या सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक:म्हणाले – संस्कृती जपणारेच असे उपक्रम राबवतात, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी सरकारने 32 हजार कोटी दिले!
