नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील बहुचर्चित इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरण आणि के. बी. गँगच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना दोन दिवस म्हणजेच ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान शासनाची बाजू विशेष सरकारी वकील यादव तळेगावकर यांनी मांडली.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व मोक्का कारवाई: नांदेड शहरातील धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ ८ ऑगस्ट २०२६ रोजी २५ वर्षीय तरुण इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी याचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मनजितसिंग बावरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात हा खून कैलास बिगानिया व नितीन बिगानिया यांच्या के. बी. गँग या संघटित गुन्हेगारी टोळीने खंडणी, धमक्या आणि वर्चस्वाच्या वादातून केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोकोका) कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत.
पोलीस कोठडीत पाठवलेले आरोपी: विशेष न्यायालयाकडून ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिलीप पुंडलीकराव डाकोरे (वय २९), कृष्णा दिगंबर बारोळे (वय २९), रंजित उर्फ रंज्या चांदु सुर्यवंशी (वय २३), ज्योती जगदिश बिगानिया (वय ४०), अजय उर्फ अज्जु महेंद्र बिगानिया (वय ३२) आणि अंजली नितीन बिगानिया (वय ३१) यांचा समावेश आहे.
न्यायालयातील युक्तिवाद: सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील यादव तळेगावकर यांनी न्यायालयात आक्रमक युक्तिवाद केला. आरोपींवर मोक्का कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल असून गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल, तसेच टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय टोळीतील फरार आरोपी नितीन बिगानिया याचा शोध घेणे, गुन्ह्याचा कट कुठे शिजला आणि साक्षीदारांना दिलेल्या धमक्यांविषयी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पोलीस तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायाधीश तुषार आगलावे यांनी सर्व आरोपींना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Post Views: 39
