![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे तब्बल २००० कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण वेरुळ परिसर चकाचक झाला. या अभियानात आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कचरा संकलनासाठी आणलेल्या वाहनांचे पूजन करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर, येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक, लेणी परिसर, गावातील महत्त्वाची मैदाने, बाजारतळ, कब्रस्तान, एमटीडीसी पार्किंग, महादेव उद्यान, दर्गा दावल मलिक आणि भीमनगर परिसर अशा अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. वेरुळ लेणी ते अरिहंत चौक, कैलास हॉटेल ते येळगंगा नदी या मार्गांवरही विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘स्वच्छता हीच ईश्वर सेवा’ असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, वेरुळ हे जिल्ह्यातील मोठे तीर्थक्षेत्र असून, येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छता व चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. अस्वच्छता ही आपल्यासाठी भूषणावह नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमदार प्रशांत बंब यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महाशिवरात्रीनिमित्त देशभरातून भाविक वेरुळ येथे येतात. त्यांना स्वच्छ आणि सुविधापूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता ही निरंतर बाब असून, त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले की, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात आहे, तरी ग्रामपंचायतीमार्फत दैनंदिन स्वच्छता केली जाते. गावातील लोकांनीही आपल्या परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांसारख्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले होते.
महाशिवरात्रीपूर्वी वेरुळ चकाचक; 2 हजार लोक, अधिकारी रस्त्यावर:जिल्हाधिकारी, आमदार सहभागी; 'स्वच्छता हीच ईश्वर सेवा' संदेश
