जळगावात डंपरच्या धडकेत वृद्धाचा चिरडून मृत्यू:जमावाकडून वाहनाची तोडफोड, चालक मोबाईलवर बोलत असताना घडली घटना




जळगाव शहरातील कालिंका माता चौकात आज दुपारी एका भरधाव डंपरने ५७ वर्षीय वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली. प्रभाकर पाटील असे मृत वृद्धाचे नाव असून, या अपघातानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक करत तोडफोड केल्याने परिसरात मोठे रणकंदन माजले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे बाजारातून भाजीपाला घेऊन आपल्या घराकडे जात असताना कालिंका माता चौकात हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक वेगात गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलण्यात मग्न होता. चालकाचे लक्ष नसल्याने डंपरचे चाक थेट पाटील यांच्या तोंडावरून गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जमावाचा उद्रेक आणि दगडफेक अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पापाचा बळी गेल्याने जमावाचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या आणि वाहनाचे मोठे नुकसान केले. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती गंभीर असल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. ‘त्या’ बालकाच्या मृत्यूची पुनरावृत्ती विशेष म्हणजे, याच कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी एका चिमुकल्याला डंपरने चिरडल्याची घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या अपघातांमुळे जळगावकरांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष आहे. सरकार रस्ते सुरक्षेच्या गप्पा मारत असले, तरी प्रत्यक्षात वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडे महत्त्वाच्या मागण्या या भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चौकात तत्काळ आधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी. या चौकात २४ तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी. रहिवासी भागात डंपरसारख्या अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणावी, अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात येत आहेत. सध्या परिसरात शांतता असली तरी तणाव कायम आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *