![]()
तिवसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या वणी फाटा येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. नागपूरमार्गे येणारी एम.एच. २७. डी.ई. ४२८२ क्रमांकाची बोलेरो गाडी इंडियन गॅस एजन्सी गोडाऊनकडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे येत होती. याचवेळी बोलेरोने एम.एच. २७. बी.आर. ०२२६ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीसह दोन्ही युवक महामार्गालगत काही अंतरावर फेकले गेले. या अपघातात वणी येथील रहिवासी असलेले दुचाकीचालक श्रीकांत सुधीर देशमुख (वय ३५) आणि मंथन बबन देशमुख (वय १८) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
वणी फाट्यावर कार-दुचाकी धडकेत दोघे गंभीर जखमी:नागपूरमार्गे येणाऱ्या बोलेरो गाडीने दुचाकीला मागून धडक दिली
