![]()
पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागात आज एका संतापलेल्या रहिवाशाने रिव्हॉल्व्हर काढून स्वतःच्या डोक्याला लावत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने पालिका परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना दुपारी सुमारे २ ते ३ च्या सुमारास घडली. कोंढवा परिसरातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने अभय योजनेच्या अंतिम दिवशी आपले कर बिल निघत नसल्याने हताश होऊन हे टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून कर संकलन विभागात नियमित येत होती. अभय योजनेअंतर्गत कर भरण्यासाठी सवलत मिळावी म्हणून त्याने आपले बिल काढण्याची विनंती केली होती. मात्र, अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्याने केला. आज अभय योजनेचा शेवटचा दिवस असतानाही बिल निघाले नाही, यामुळे तो अतिशय संतापला. हताश होऊन त्याने आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर काढली आणि डोक्याला लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली.घटनेच्या वेळी पालिकेतील सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी धैर्याने या व्यक्तीला रोखले आणि रिव्हॉल्व्हर हस्तगत केली. यानंतर घटनास्थळी पुणे पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलिसांनी सदरील व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर कुठून आली? त्याचा परवाना आहे का? याचा तपास सुरू केला आहे. तसेच, कर विभागातील अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ झाली की नाही? याचीही चौकशी होत आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अभय योजनेसारख्या सवलत योजनांमध्ये नागरिकांना योग्य वेळेत सेवा मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, लवकरच नेमकी माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
संतप्त रहिवाशाचा पुणे महापालिकेत गोंधळ:रिव्हॉल्व्हर डोक्याला लावत आत्महत्येची धमकी, कर बिल न मिळाल्याने उचलले पाऊल
