![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी या शपथविधीच्या ‘टायमिंग’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र सुनेत्रा पवारांची पाठराखण केली आहे. “जर सुनेत्रा वहिनींनी हा टायमिंग साधला नसता, तर शरद पवारांनी नक्कीच भाकरी फिरवली असती आणि त्यांच्यावर अन्याय झाला असता,” असे खळबळजनक विधान हाके यांनी केले आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर कोणी कितीही टीका केली असली, तरी राजकारणात टायमिंगला महत्त्व असते. जर त्यांनी हा टाइमिंग साधला नसता तर राजकारणात कुशल पट्टू म्हणून प्रसिद्ध असलेले शरद पवारांनी नक्कीच भाकरी फिरवली असती आणि सुनेत्रा ताईंवर अन्याय झाला असता.” अजितदादांपेक्षाही सुनेत्रा ताई चांगले राजकारण करतील’ असा विश्वासही हाके यांनी व्यक्त केला आहे. दादांच्या निधनामुळे दिवसभर जेवणही गेले नाही अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त करताना लक्ष्मण हाके भावूक झाले. ते म्हणाले, “अजित पवार आणि आमच्यात वैचारिक आणि सामाजिक मतभेद असले, तरी त्यांचा असा मृत्यू होणे अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्या दिवशी मला दिवसभर अन्नाचा कणही गेला नाही. अशी घटना कुणासोबतही घडायला नको होती.” रोहित पवारांना आव्हान, चौकशीचे समर्थन अजित पवारांच्या विमान अपघातावरून सुरू असलेल्या संशयावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले. “रोहित पवारांनी या मृत्यूचे राजकीय भांडवल करू नये. जर त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते समोर आणावेत. बीडच्या खासदारांनी जर या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असेल, तर त्याचे स्वागतच आहे. या प्रकरणाचे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच हवे,” असेही त्यांनी नमूद केले. मनोज जरांगेंवर सडकून टीका सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ‘झुरळ आणि ढेकणं’ या विधानाचा लक्ष्मण हाकेंनी तीव्र समाचार घेतला. ते म्हणाले, ” ‘या ढेकणा, झुरळांनी केलंय काय तर अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे जरांगे पाटलाची मानसिकता तपासली पाहिजे. जरांगे पाटील हा शरद पवार, रोहित पवार, बजरंग सोनवणे यांची स्क्रिप्ट वापरतो. तो स्वतःच्या डोक्याने काही बोलत नाही, त्यामुळे तो डोक्याचा भाग कमी असलेला माणूस आहे. त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही.”
राजकारणात टायमिंगला महत्त्व:सुनेत्रा पवारांनी टाइमिंग साधला नसता, तर शरद पवारांनी 'भाकरी' फिरवली असती – लक्ष्मण हाके
