![]()
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी लोणावळा परिसरातील अनेक दुर्गम ठिकाणांची माहिती घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये लोणावळ्यातील टायगर पॉइंट, लोहगडलगतचा विसापूर किल्ला तसेच परिसरातील अन्य किल्ल्यांचा समावेश होता, अशी माहिती तपास पथकातील एका अधिकाऱ्याने दिली. कटाची अंमलबजावणी करण्यासाठी लोहगड किल्ला अंतिम करण्यापूर्वी चेतन आणि सिया यांनी लोणावळा परिसरातील त्याच प्रकारच्या अन्य ठिकाणांचा शोध घेतला होता. टायगर पॉइंट तसेच लोहगडच्या शेजारी असलेल्या विसापूरसह इतर किल्ल्यांचाही त्यांनी विचार केला होता,’ असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. तपासातील माहितीनुसार, संशय निर्माण होणार नाही आणि मृत्यू अपघाती वाटेल, अशा ठिकाणाला दोघांनी प्राधान्य दिले होते. शस्त्र अथवा अन्य हत्याराचा वापर केल्यास तपास यंत्रणांना हत्येचा संशय येऊ शकतो, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे पुरावे मिळण्याची शक्यता कमी असलेल्या आणि अपघाताचा देखावा निर्माण करता येईल, अशा विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. अखेर भौगोलिक परिस्थिती आणि गर्दीसह अन्य बाबींचा अंदाज घेतल्यानंतर लोहगड किल्ला अंतिम केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. दरम्यान, सिया आणि चेतन यांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी संपर्क साधल्याच्या वृत्तांबाबतही अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. केतनची हत्या करण्यासाठी नव्हे, तर त्याला गंभीर जखमी करण्यासाठी एखाद्याला सुपारी देण्याच्या पर्यायावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, त्यासाठी त्यांनी कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधला नव्हता, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. केतनला मारहाण करणे, लूटमारीचा बनाव करणे किंवा अपघात घडवून त्याला जखमी करणे, अशा प्राथमिक पर्यायांवरही कथितरीत्या विचार झाला होता. विवाह किंवा विवाहपूर्व कार्यक्रम रद्द व्हावेत, हा त्यामागील सुरुवातीचा उद्देश होता का, याचाही तपास सुरू आहे. गुन्ह्यापूर्वी दोघांनी लुल्लानगर टेकडीवर केली रंगीत तालीम पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सियाचा प्रियकर चेतन चौधरी स्वतः या योजनेच्या अंमलबजावणीत सामील झाला. चेतनने आधीच लोहगड गाठले. तेथे योग्य संधी साधून त्या दोघांनी मिळून केतनला १८ जून रोजी खोल दरीत ढकलून दिले. गुन्ह्यापूर्वी दोघांनी पुण्यातील लुल्लानगर भागातील एका टेकडीवर या कृत्य प्रत्यक्ष कसे करायचे, याची तालीम देखील केली होती. पोलिस आता सर्व पुराव्यांची पाहणी करून भक्कम आरोपपत्र तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. साखरपुड्यापूर्वी सिया-चेतन गोव्यात गेले केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात सिया आणि चेतन यांच्या संबंधांबाबत नवी माहिती समोर आली आहे. डिसेंबर महिन्यात राजस्थानची सहल केल्यानंतर आणि केतनसोबत फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा होण्यापूर्वी सिया व चेतन यांनी गोव्याची सहल केल्याचे तपासातून पुढे आल्याचा दावा करण्यात येत आहे. या सहलीदरम्यान दोघांनी समुद्रसफरही केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात येते. एकूणच पोलिस याचा सखोल तपास करत आहेत. डिजिटल पुराव्यांची छाननी या चर्चा नेमक्या कधी आणि कोणत्या माध्यमातून झाल्या, हे निश्चित करण्यासाठी मोबाइलमधील संभाषणे, ऑनलाइन शोध, कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनसंबंधी डिजिटल पुराव्यांची छाननी केली जात आहे. सर्व आरोप तपासाधीन असून अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील.
केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा
