अमरावतीत मोठा राजकीय भूकंप:एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मिराबाई कांबळेंची पक्षातून हकालपट्टी




अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांच्या मदतीची गरज असतानाच, एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला मतदान केले. या अनपेक्षित क्रॉस व्होटिंगमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात नवीन वळण आले आहे. मिराबाई कांबळे यांच्या या कृतीची गंभीर दखल घेत एमआयएम पक्षाने त्यांना तडकाफडकी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या गटनेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत ‘व्हीप’ (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. मात्र कांबळे यांनी विचारधारेच्या विरोधात जाऊन भाजपला मतदान केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई अटळ असल्याचे सांगत, गटनेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा केली आहे. आपण केलेल्या कृतीवर स्पष्टीकरण देताना मिराबाई कांबळे म्हणाल्या की, महापौर पदासाठी मला ते चांगले वाटले, काम करणारे वाटले म्हणून मी त्यांना मतदान केली. मी माझे विचार मांडूनच मतदान केलए. मला पक्षाने नाही सांगितले पण मला महापौर पदाचे हे उमेदवार चांगले वाटले, विकास करणारे वाटले म्हणून मी मतदान केल्याची माहिती कांबळे यांनी दिली. तसेच पक्षाकडून कारवाई जर झाली तर मार्ग भरपूर असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हाध्यक्षांवर कारवाई करणार- इम्तियाज जलील या घटनेवर एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मिरा कांबळे नावाच्या महिला नगरसेवकने महापौर पदासाठी भाजपच्या उमेदवाराला हात वर करून मतदान केले. ही बातमी जेव्हा आम्हाला समजली तेव्हा आम्ही अमरावतीच्या एमआयएमचे जे प्रमुख आहेत आणि विदर्भाचे प्रमुख त्यांना मी प्रश्न केला आहे की तुम्ही व्हीप का नव्हते जारी केले. तसेच अमरावतीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *