साकोलीत 'राजकीय भूकंप' की जुनी कटुता संपली?:पालकमंत्र्यांच्या गाडीत पटोले – फुके 'बॅक सीट'वर; सुकळीतील भोजनाचे 'इनसाइड' डिटेल्स




राजकारणात ‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता है’ असे म्हणतात, पण भंडाऱ्यात तर ‘दुश्मनच दोस्त’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लाखांदूरमधील क्रीडा स्पर्धेनंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या घरी झालेल्या मेजवानीचे नवनवे पदर आता समोर येत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक डॉ. परिणय फुके यांनी चक्क पालकमंत्र्यांच्या शासकीय गाडीतून एकत्र प्रवास केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ​२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघात नाना पटोले आणि डॉ. परिणय फुके यांच्यात झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. ज्या निवडणुकीत फुकेंनी पटोलेंचा उल्लेख ‘चिल्लर’ असा करत खालच्या पातळीवर टीका केली होती, तेच दोन्ही नेते आता खांद्याला खांदा लावून (आणि एकाच गाडीच्या मागच्या सीटवर बसून) फिरताना दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या गाडीत हे तिन्ही नेते स्वार झाले. विशेष म्हणजे ​गाडीच्या मागच्या सीटवर नाना पटोले आणि डॉ. परिणय फुके एकमेकांच्या शेजारी बसले होते. ​ज्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध रक्ताचे पाणी करून निवडणूक लढवली, त्यांच्यातील ही ‘बॅक सीट केमिस्ट्री’ चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ​पालकमंत्र्यांच्या गाडीतून थेट पटोलेंच्या सुकळी येथील निवासस्थानी हा ‘राजकीय ताफा’ भोजनासाठी पोहोचले.​ एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता एकत्र जेवण करत असल्याने साकोलीत चर्चांना उधाण आले आहे. त्यात नाना पटोले पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का?, की हा केवळ शिष्टाचार आहे की आगामी निवडणुकीसाठी आखलेली नवी रणनीती?, ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केली, त्यांनी आता आपल्या नेत्यांच्या या ‘गळाभेटी’कडे कसे पाहायचे? असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. दरम्यान, साकोलीच्या राजकीय वर्तुळात सध्या हाच एक चर्चेचा विषय असून, पालकमंत्र्यांच्या गाडीतील त्या प्रवासाने अनेक गुपिते दडवल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *