![]()
मुंबईतील शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानी झालेल्या तब्बल 2.65 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अनेक वर्षे घरात काम करणाऱ्या विश्वासू नोकराला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे तपासात समोर आले आहे. 24 वर्षांपासूनचा नोकरच निघाला संशयित या प्रकरणात गुन्हे शाखेने प्रवीण रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेली 24 वर्षे अहिर कुटुंबाकडे काम करत होता. घरासोबतच कार्यालयाच्या स्वच्छतेची जबाबदारीही त्याच्याकडे होती. प्राथमिक चौकशीत चोरीतील माल विकून त्यातून मिळालेली रक्कम इतर साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने चोरी तपासानुसार, ही चोरी एका दिवसात झालेली नसून गेल्या पाच वर्षांत हळूहळू करण्यात आली. घरातील मौल्यवान वस्तू एक-एक करून गायब करण्यात आल्या. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये सुमारे 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांच्या महागड्या बांगड्या, चांदीची भांडी आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमेचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आगीत बिघडलेल्या CCTVचा घेतला फायदा 2025 मध्ये शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाला होता. तपासात याच परिस्थितीचा फायदा घेत चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घरातील इतर काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता तपासली जात असून, त्यांच्याविरोधातही चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचा तपास वेगात 16 जुलै 2026 रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. झारखंडमध्ये काही कर्मचाऱ्यांनी अचानक घरे, वाहने आणि मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर संशय बळावला. त्यानंतर चौकशीदरम्यान चोरीचा प्रकार समोर आला. न्यायालयाने अटक आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, उर्वरित चोरीचा माल आणि इतर संशयितांचा शोध सुरू आहे. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगर: चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी: सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. सविस्तर वाचा
उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात तब्बल 2.65 कोटींची चोरी:24 वर्षांपासूनचा विश्वासू नोकर अटकेत, बिंग कसं फुटलं?
