Rohit Pawar Protest Controversy; Navnath Ban Video Bomb Allegations


“पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे नसून आमदार रोहित पवार यांनी प्रायोजित केलेला हा शुद्ध राजकीय कार्यक्रम आहे. या आंदोलनात केवळ 20 टक्के निरागस विद्यार्थी असून, उर्वरित 80 टक्के हे बारामती ॲग्रोचे कर्मचारी, युवक काँग्रेसचे

.

पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 3 आणि 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीचे कथित सीसीटीव्ही फुटेज माध्यमांसमोर सादर केले. या व्हिडिओचा दाखला देत त्यांनी युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे आणि त्यांच्या साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत.

कोरेगाव पार्कात मध्यरात्री मुलीवरून तुंबळ हाणामारी; सीसीटीव्ही फुटेज जाहीर

नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या व्हिडिओ आणि घटनाक्रमाचा संदर्भ देत सांगितले. “युवक काँग्रेसचा नेता शिवराज मोरे, जो स्वतःला एमपीएससी आंदोलनाचा प्रमुख नेता म्हणून मंचावर मिरवतो, तो 3-4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड वाजेपर्यंत अलका टॉकीज चौकातील आंदोलनस्थळी उपस्थित होता. त्यानंतर दीड वाजता तो स्कॉर्पियो (MH 14 KT 2122) आणि मारुती सुझुकी (MH 11 DH 9264) या गाड्यांमधून कोरेगाव पार्क लेन नंबर 7 कडे रवाना झाला.”

रस्त्यावर धिंगाणा आणि मारहाण

“शिवराज मोरे, तारीक बागवान आणि अनिकेत नवले यांनी मध्यरात्री मद्यपान करून रस्त्यावर एका मुलीच्या प्रकरणावरून तुंबळ राडा घातला. मुलीसोबत असलेल्या तरुणाशी थेट मारहाण, धक्काबुक्की आणि छेडछाड करण्यात आली. हे फुटेज पुण्याच्या रस्त्यावरील असून, रोहित पवारांनी सांगावे की हाच त्यांचा संस्कार आहे का? हेच त्यांचे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का?”

ड्रग्ज पकडल्याचा ‘दृश्यम’ ड्रामा कशाला?; पोलिसांचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

शिवराज मोरे यांनी मारहाणीच्या संदर्भात केलेल्या दाव्यांवर नवनाथ बन यांनी सडकून टीका केली, “मारहाण झालेला तरुण ड्रग्ज बाळगत होता, असा बचाव आता मोरे करत आहेत. परंतु, 3-4 तारखेला घडलेल्या घटनेनंतर आज 7 तारीख उजाडली, तरी शिवराज मोरे यांनी कोणत्या पोलीस ठाण्यात जाऊन ड्रग्ज जमा केले? तक्रार का दिली नाही? गुन्हा लपवण्यासाठी ते ‘दृश्यम’ चित्रपटासारखी खोटी स्क्रिप्ट रचत आहेत.”

स्वतः नशा करत होते का?

“त्या तरुणाकडे चाकू होता की ड्रग्ज, हे ठरवण्याचा अधिकार मोरे यांना कोणी दिला? कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचे अधिकार पोलिसांनी त्यांना दिलेत का? समोरच्याकडे ड्रग्ज आहेत हे त्यांना कसे समजले? स्वतः मोरे ड्रग्ज घेत होते का? या सगळ्याचा जाब मोरे आणि रोहित पवारांनी महाराष्ट्राला दिला पाहिजे.”

प्रेमभंगाची कॅसेट कोणाची वाजली?; रोहित पवारांची हिट विकेट!

शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “माझा प्रेमभंग झाला म्हणून मी आरोप करतोय, अशी हास्यास्पद टीका मोरे यांनी केली होती. मात्र, आता एका मुलीसाठी रस्त्यावर उतरून दादागिरी करताना कोणाची ‘हिट विकेट’ पडली, हे संपूर्ण महाराष्ट्र सीसीटीव्हीमध्ये पाहत आहे. गर्लफ्रेंड कोणाची होती, भांडण कोणासाठी झाले आणि कोणाचा खरा प्रेमभंग झाला, हे आता मोरे यांनीच जाहीर करावे.”

वारशाने मिळालेली आमदारकी; रोहित पवारांनी कधी फॉर्म तरी भरलाय का?

रोहित पवारांच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधताना नवनाथ बन म्हणाले, “रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यात कधी साधी एमपीएससीची परीक्षा दिली आहे का? एमपीएससीचा फॉर्म कसा भरतात आणि स्पर्धा परीक्षेचे दुःख काय असते, हे त्यांना काय ठाऊक? आजोबा मुख्यमंत्री होते म्हणून त्यांना वारशाने आमदारकी मिळाली; अन्यथा त्यांना कोणी साध्या ग्रामपंचायतीचा सदस्यही केले नसते. आता ते स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला नेता म्हणून प्रोजेक्ट करत आहेत.”

महिला पत्रकारांना अश्लील ट्रोलिंग

“भाजपचा कोणताही नेता बोलला की रोहित पवारांची ट्रोलधाड त्यांच्यावर तुटून पडते. एका वृत्तवाहिनीच्या महिला संपादकांना अत्यंत अश्लील भाषेत ट्रोल करण्याचे नीच कृत्य याच गुंडांनी केले. मात्र, भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही.”

विद्यार्थ्यांनी कोर्टाचा आदर करून अभ्यासाला लागावे!

मुंबई उच्च न्यायालयाच्या आजच्या भूमिकेचा संदर्भ देत बन यांनी शेवटी नमूद केले, “स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व रास्त मागण्या मान्य केल्या आहेत. आज मुंबई हायकोर्टानेही स्पष्ट केले आहे की विद्यार्थी समाजविघातक नाहीत, त्यांनी राजकीय नेत्यांच्या नादी न लागता त्वरित वर्गखोल्यांमध्ये आणि अभ्यासाकडे परतावे. त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांनी या राजकीय धिंगाण्यापासून दूर राहावे आणि पोलिसांनी या रात्रीच्या राड्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी,” अशी आग्रही मागणी नवनाथ बन यांनी केली.

————————————–

हेही वाचा…

MPSC आंदोलनाचा सातवा दिवस: महाज्योतीच्या गोंधळामुळे रोहित पवारांचा संताप, म्हणाले- आता एमपीएससी अध्यक्षांसह मंत्री अतुल सावेंचाही राजीनामा घ्या

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना परीक्षा देता आली नसल्याचा दावा करण्यात आला. सकाळी ९ ते ११ अशी परीक्षेची वेळ असतानाही सुमारे दोन तास विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर थांबल्या होत्या. अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2026. All rights reserved. Theme Rubik News by Kantipur Themes