पुण्यातील MPSC आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला हादरवून सोडणारा तरुण अभ्यासक विवेकानंद पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या दुर्गम भागातून आलेल्या विवेकानंदची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन अन् डोक्यावर पत्र्याचं छप्पर… अशा अत्यंत साध्या आणि पारंपरिक घरात राहून विवेकानंद MPSC ची तयारी करत आहे. त्याच्या या संघर्षाचा आणि जिद्दीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून विशेष कौतुक विवेकानंदच्या या संघर्षाची दखल थेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यांनी एक्स वर व्हिडिओ शेअर करत विवेकानंद पाटीलच्या जिद्दीचे मनापासून कौतुक केले. मंत्री सामंत म्हणाले, “सोशल मीडियावर आज एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडिओ दिसला. त्यांच्या घरात स्वामी विवेकानंद यांचा फोटो बघून आनंद झाला. स्वामी विवेकानंद म्हणायचे, “ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान आणि एकाग्रता. एकाग्रतेच्या साहाय्यानेच विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचता येते.” विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते. मात्र, त्यापेक्षाही त्यांच्या घरातील पारितोषिकांनी माझ्या मनाला अधिक समाधान दिलं… त्यामुळं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन सदैव उभं आहे, एवढीच हमी यानिमित्तानं देतो…”
स्वाभिमानी बाणा: विश्वजीत कदमांची ऑफर अत्यंत नम्रपणे नाकारली दुसरीकडे, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी विवेकानंदच्या घरच्या परिस्थितीची माहिती मिळताच त्याला आपल्या स्वखर्चाने नवीन पक्के घर बांधून देण्याची मोठी ऑफर दिली. मात्र, विवेकानंद पाटील यांनी अत्यंत नम्रतेने आणि स्वाभिमानाने ही ऑफर फेटाळून लावली. “माझ्यात कष्ट करण्याची धमक आणि क्षमता आहे. तरुण वयात मी माझ्या परिस्थितीचा किंवा आंदोलनाचा असा फायदा घेऊ शकत नाही. स्वतःच्या मेहनतीनेच मी माझे भविष्य घडवेन,” असे स्पष्ट करत विवेकानंदने आपल्या स्वाभिमानी विचारांची चुणूक दाखवून दिली. त्याच्या या निर्णयामुळे आता देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
