'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय गायकवाड काय करतात बघू, अॅड. असीम सरोदे यांचे थेट आव्हान
![]()
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे. या कथित संवादाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाली आहे. यावरून विरोधकांनी गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता अॅड. असीम सरोदे यांनी थेट आव्हान दिले आहे. बुलढाण्यात लवकरच ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे जाहीर वचन करण्यात येणार. संजय गायकवाड काय करतो बघू, अशा शब्दात असीम सरोदे यांनी थेट आव्हान दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘शिवाजी कोण होता’ असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाडचा आक्षेप आहे व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला की, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला. पुढे असीम सरोदे म्हणाले, सॅल्यूट केला पाहिजे प्रशांत आंबी या प्रकाशकाला की भाषेचा स्तर, आवाजातील स्वर ढळू न देता अत्यंत संयमित पद्धतीने त्याने गुंड प्रवृत्तीच्या आमदार संजय गायकवाड याच्या सोबत संवाद केला. आत्ताच माझे प्रशांत सोबत बोलणे झाले. संजय गायकवाड विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार. संजय गायकवाड आमदार आहे म्हणजे शिवीगाळ करण्याचे, कुणालाही मारहाण करण्याचे लायसन्स त्याला मिळालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आई प्रमाण हृदयातील स्थान देऊन ‘शिवाजी’ म्हणणं म्हणजे महाराजांचा अपमान नाही. बरं संजय गायकवाड सारखे अशिक्षित, अडाणी प्रवृत्तीचे लोक पूर्ण पुस्तक वाचत सुद्धा नाहीत व इतरांना शिवीगाळ सुरु करतात. आता अश्या मूर्खतेला कायद्याच्या मदतीने नेहमीसाठी लगाम लावावा लागेल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
