अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. निवडणूक आयोगाच्या कारभारावर सपकाळांचे प्रश्न निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात संभ्रम असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सध्या निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी असल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्याऐवजी काही लोक त्याची बाजू घेताना दिसत आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीवरून टोला लगावला. राजू शेट्टी यांचे नशीब चांगले की ते एकटे गेले आणि त्यांना निवडणूक आयुक्तांची भेट मिळाली. दुसरीकडे, आम्ही 300 खासदारांना सोबत घेऊन गेलो, तरी निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडून महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने लोकांमधील अस्वस्थता वाढत आहे. आगामी काळात निवडणुका होतील की नाही, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे सपकाळ यांनी सूचित केले. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरून तटकरेंना घेरले अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान दुर्घटनेच्या तपासातील काही बाबींवर संशय व्यक्त करत त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकांबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबंधित कंपनीच्या मालकाला वाचवत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणात आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मात्र, तटकरेंच्या या भूमिकेवर सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत इतके दिवस काय केले? आतापर्यंत झोप काढत होतात का? अशा शब्दांत त्यांनी तटकरेंना लक्ष्य केले. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या प्रकरणातील संशय दूर होण्यासाठी तपासाबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे, असा सूरही सपकाळ यांच्या वक्तव्यातून दिसून आला. मोदींच्या सोनं खरेदीच्या वक्तव्यावरूनही टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीसंदर्भात केलेल्या आवाहनावरूनही सपकाळ यांनी टीका केली. वर्षभरापूर्वीच आपण गरज नसेल तर सोन्याची खरेदी करू नये, असे सांगितले होते. लोकांनी आपले ऐकले आणि त्याचा त्यांना फायदा झाला, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी मोदींच्या जुन्या आवाहनांची आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरे करू नका, असेही सांगितले होते. तसेच भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी काय केले, याकडे लक्ष वेधत सपकाळ यांनी मोदींना टोला लगावला. सर्वसामान्यांना काटकसरीचे सल्ले देण्याऐवजी स्वतःच्या कृतीतूनही उदाहरण घालून देण्याची गरज असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला. डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेसचा विरोध कायम मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. भाजपला डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशात पुन्हा जातीय तेढ आणि दंगली निर्माण करायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. या विधेयकाला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा विरोध असून, याबाबत आघाडीच्या पातळीवर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचेही सपकाळ यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे या आपली भूमिका मांडत आहेत. मात्र, सध्या त्या केवळ विधेयकासंदर्भात बोलत आहेत. प्रत्यक्षात डिलिमिटेशनचे विधेयक अद्याप आलेले नसताना त्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले. या मुद्द्यावर इंडिया आघाडीची पुढील भूमिका काय असेल, हे चर्चेनंतर स्पष्ट होईल, असेही त्यांनी सूचित केले. रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशावर बोलणे टाळले दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत आणि त्यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांबाबतही सपकाळ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या कामाचे आम्ही कौतुक करतो. मात्र, त्यांच्या पक्षातील अंतर्गत निर्णय आणि राजकीय घडामोडींवर आम्ही बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगत सपकाळ यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. एकीकडे अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी निवडणूक आयोग आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सपकाळ यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. हेही वाचा…. ‘दावे करून चालणार नाही, पुरावे द्या’:संजय राऊतांच्या 150 कोटींच्या आरोपावर छगन भुजबळांचा पलटवार; काय म्हणाले भुजबळ? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला असून, या मुद्द्यावरून ते गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर टीका करत आहेत. राऊत यांच्या या दाव्यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील येवला येथे माध्यमांशी बोलताना राऊत यांच्या या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करत त्यावर आपली भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचा…..

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin