'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून वाद:रोहिणी खडसे म्हणाल्या- संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांची PhD; संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार
![]()
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे. या कथित संवादाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यातील भाषेमुळे सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर राजकीय वर्तुळातून कडक टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या कामाबद्दल आक्षेप घेताना अशा प्रकारे अश्लील भाषेचा वापर करणे आणि धमकावणे अशोभनीय असल्याचे सांगत खडसे यांनी त्यांचा निषेध केला आहे. “जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है” रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, “जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है”. हिंदीतील ही प्रसिद्ध कविता आमदार संजय गायकवाड यांना तंतोतंत लागू पडते. कधी गरीब कर्मचाऱ्यांना मारहाण करतात तर काही विचित्र आणि वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवत असतात. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’, या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांची पीएचडी पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, श्री. गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो? वाचन आणि त्यांचा काही दूर दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएचडी घेतली आहे. खरंतर हे लोक लिटमस टेस्ट करत असतात, समाजात याची काय रिऍक्शन येते ते हे लोक पाहत असतात. पण कॉम्रेड पानसरेंसारखी विवेकी माणसं शेवटच्या क्षणापर्यंत समाजाची एकी आणि सत्याची कास धरून असतात, म्हणूनच ते अमर ठरतात, असे खडसे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य जे काही स्वातंत्र्य आहे ते संविधानाने दिले आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत कोणी चुकीचे लेखन केले असेल तर ते पापच आहे असे मी म्हणेल. परंतु, अशी धमकी जर कोणी दिली असेल तर ते चुकीचे आहे. आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे- विजय वडेट्टीवार पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्या प्रकाशकाला संरक्षण दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे राजे होते. पानसरे यांनी लिहिलेले पुस्तक ते बरोबरच होते आणि म्हणूनच त्यांना धमकी मिळत आहे, असे वडेट्टी वार म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले की, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव चित्रण कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक तथा पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते श्री. प्रशांत आंबी यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी “पानसरेचे जे हाल केले, तसे हाल करू” अशी धमकी दिली आहे. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला, त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. प्रकाशकाला संरक्षण दिले पाहिजे असे असताना स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखला देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. धमकी देणाऱ्या आमदार विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. त्यांनी सत्तेसाठी अशा निर्बुद्ध आमदारांना पाठीशी न घालता तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच सत्ताधारी आमदाराकडून जीवाला धोका असल्यामुळे प्रशांत आंबी यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
