गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात अमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट वाढला असून, पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवायांनंतरही ड्रग्जची गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या ताफ्यात देशातील पहिलीच अत्याधुनिक व्हॅन दाखल झाली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथील एका कॉन्सर्टच्या निमित्ताने ही व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या या विशेष व्हॅनमध्ये अशी अत्याधुनिक तपासणी प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीने ड्रग्जचे सेवन केले असल्यास अवघ्या पाच मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे. संबंधित व्यक्तीने नेमक्या कोणत्या प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले आहे, हे यातून तात्काळ स्पष्ट होईल. याशिवाय कारवाईदरम्यान घटनास्थळावरील पंचनामा, चित्रीकरण आणि पुराव्यांचे संकलन एकाच ठिकाणी अचूकपणे करता यावे, हा या व्हॅनचा मुख्य उद्देश आहे. पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन आणि ‘तपास सारथी’चा वापर सायबर गुन्हे, सोशल मीडिया आणि डार्क नेटद्वारे वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या व्हॅनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. संकलित केलेले पुरावे कोणत्याही छेडछाडीशिवाय सुरक्षित आणि विश्वासार्ह राहावेत, यासाठी यात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. तसेच व्हॅनमधील ‘तपास सारथी’ प्रणालीमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून ते न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतच्या संपूर्ण तपास प्रक्रियेवर पोलिसांना तांत्रिक देखरेख ठेवता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देशात पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या या अँटी-नार्कोटिक्स व्हॅनचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. अमली पदार्थांविरोधातील कारवाईपासून ते गुन्ह्यांच्या तपासातील पुरावे सुरक्षित ठेवण्यापर्यंत या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होईल. शहरातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांमध्ये कायद्याची जरब बसवण्यासाठी ही व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin