मोबाईलच्या अतिवापरापासून डोळे जपा:अभोण्यात डॉ. संजना‎आहेर यांचे आवाहन‎‎




मोबाईलचा वापर कमी करण्यासोबतच ‘२०-२०-२०’ नियमाचे पालन करावे. संगणक किंवा मोबाईलवर काम करताना दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावरील वस्तूकडे वीस सेकंद पाहावे, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजना आहेर यांनी दिला. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर, हिरव्या पालेभाज्या व फळांचा आहारात समावेश करावा, रात्री पुरेशी झोप घ्यावी, विनाकारण डोळे चोळू नयेत तसेच वर्षातून एकदा नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांची समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत औषध टाकू नये, असेही त्यांनी सांगितले. डॉ. विजय बीडकर स्मृती दिनानिमित्त अभोणा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्तृत्वांगण सोशल फाउंडेशन, अशोका हॉस्पिटल व जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आहेर बोलत होत्या. डॉ. एस. आर. थोरवत यांनी प्रास्ताविकात डॉ. विजय बीडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. एन. बी. कोठावदे यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध आजारांच्या १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर २५ बॅग रक्त संकलित करण्यात आले. यावेळी डॉ. प्रथमेश सोनवणे, कीर्ती जाधव, चंद्रशेखर जोशी, पद्मभूषण शहा, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन प्रा. के. पी. पवार यांनी केले, तर प्रा. एस. आर. राजभोज यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *