गुंडापाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत आंध्रप्रदेशातील भाविक ठार:हट्टा पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल
![]()
औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने आंध्रप्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 22 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशातील काही भाविक एका टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे बारा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेसाठी गेले होते. उज्जैन, प्रयागराज व इतर देवस्थानांच्या ठिकाणी दर्शन घेऊन मंगळवारी ता. 21 औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी नागनाथाचे दर्शन घेऊन भाविक परळी वैजनाथकडे निघाले होते. मात्र बुधवारी ता. 22 रात्र झाल्यामुळे त्यांनी औंढा नागनाथ ते परभणी शिवारात गुंडा शिवारात मुक्काम करण्याचे ठरविले होते. त्यानुसार रात्री मुक्कामी थांबले होते. दरम्यान, बुधवारी ता. 22 पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश्वरा नागनाथ गच्चे (62) रा. रुद्रपेठ बायपास, अनंतपूर जिल्हा अनंतपूर, आंध्रप्रदेश) हे लघुशंकेसाठी उठले होते. यावेळी रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षस संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार ताम्रध्वज कासले, शेख हाकीम, स्वामी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस व भाविकांनी अपघातातील गंभीर जखमी झालेल्या व्यंकटेश्वरा यांना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी प्रकाश एकबोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक गवळी पुढील तपास करीत आहेत.
