राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 मार्क:जुळ्या भावंडांना एकसमान 97.2% मार्क; 41 वर्षांच्या खंडानंतर 63 वर्षीय महिला पास
![]()
इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 गुण मिळाल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नाही तर नागपुरातील जुळ्या भावंडांना सेम टू सेम 97.2 टक्के गुण मिळाल्यामुळे या यशाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थीनीला सर्व विषयांत 35 मार्क मिळाले. निकिता शहरातील ज. रा. चंडक प्रशालेची विद्यार्थिनी आहे. तिने एका दुर्धर आजारावर मात करत हे यश मिळवले. सुरुवातीला आजारपणामुळे तिची परीक्षेला जायची इच्छा नव्हती. पण शिक्षकांनी आग्रह केल्यामुळे ती परीक्षेला बसली आणि पास झाली. तिच्या पालकांनी तिच्या यशावर आनंद व्यक्त केला आहे. माझ्या मुलीला हृदयाचा त्रास आहे. ती वर्षातून 2-3 महिने झोपूनच असते. मी बांधकाम कामगार आहे. मुलीने शिकावे अशी माझी इच्छा आहे. आता तिला सर्व विषयांत एकसमान 35 गुण मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. तिला कमी गुण मिळाले तरी हरकत नाही. आम्ही तिला शिकवणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. अक्षय़ भालेरावला सर्व विषयांत 35 गुण सोलापूरच्याच करमाळा तालुक्यातील कामोने येथील अक्षय बाळासाहेब भालेराव या विद्यार्थ्यालाही दहावी बोर्डात सर्व विषयांत एकसमान 35 गुण मिळालेत. त्याला 500 पैकी 175 गुण मिळाले. त्याच्या या अनोख्या यशाची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, मित्र परिवार व नातेवाईक त्याचे कौतुक करत आहेत. बोहाळीच्या सूरज मलपेलाही 35 टक्के गुण दुसरीकडे, पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील सूरज आप्पासो मलपे यालाही सर्व विषयांत एकसमान 35 गुण मिळालेत. सूरच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. त्याची आई मजुरीला जाते, तर वडीलही मिळेल ते काम करतात. सूरजने आपल्या पालकांना कामात मदत करत हे यश मिळवले आहे. त्याने आपल्याला मिळालेल्या गुणांवर समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांनी व पालकांनी त्याच्या यशाचे पेढे वाटून कौतुक केले. नागपुरात जुळ्या भावंडांना एकसमान मार्क उल्लेखनीय बाब म्हणजे नागपुरातील जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत एकसमान गुण मिळालेत. खिलाज व खुशी चांदेवर असे या भावंडांचे नाव आहे. या दोघांनाही एकसमान 97.2 टक्के गुण मिळालेत. हे दोघेही सोमलवार शाळेचे विद्यार्थी आहेत. ते एकत्रच अभ्यास करायचे. पण वेगवेगळ्या नोट्स काढायचे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 ने जास्त या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 10,031 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,912 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 9,042 दिल्यां विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 91.22 आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 असून मुलांची टक्केवारी 89.56 आहे. म्हणजेच मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 ने जास्त आहे. 63 वर्षीय महिलेने 41 वर्षांनंतर दिली परीक्षा दुसरीकडे, लता गमरे नामक एका 63 वर्षीय महिलेने तब्बल 41 वर्षांच्या खंडानंतर दहावीची परीक्षा 50.50 टक्के गुणांसह पास केली आहे. लता यांनी यापूर्वी 1984-85 या शैक्षणिक वर्षात दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. पण त्यावेळी त्या नापास झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटले होते. त्यानंतर संसार, जबाबदाऱ्यांच्या ओघात शिक्षण मागे पडले. पण त्यांच्या मनात दहावी पास होण्याचे स्वप्न होते. अखेर त्यांनी पुन्हा पुस्तके हातात घेत शिक्षणाची नव्याने सुरुवात केली. त्यांनी गोरेगावच्या संतोषनगर इव्हिनिंग लर्निंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर यंदा झालेल्या परीक्षेत त्या 50.50 टक्के गुणांसह पास झाल्या. त्या आपल्या यशावर भाष्य करताना म्हणाल्या, मला नेहमीच माझे शिक्षण पूर्ण करायचे होते, पण संधी मिळाली नाही. आता मिळालेल्या पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मला माझे स्वप्न पूर्ण करता आले आणि आता मी माझ्या नातवंडांना अभ्यासात मदत करू शकेन.
