जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून शाईफेक:सुपाऱ्याही फेकल्या; राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक

0
ezgifcom-resize-12_1778325103.gif




वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. यावेळी शाईफेकीसोबत सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या आहेत. ही घटना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली आहे. सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याच्या निषेधार्थ मनसैनिकांकडून सदवार्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात असताना त्यांची गाडी विशाल कॉर्नर परिसरात आली तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सदावर्ते यांच्या गाडीवर शाईसह सुपाऱ्या फेकल्या. त्यानंतर तातडीने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर देखील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात येत होती. या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. नेमके प्रकरण काय? मागील महिन्यात लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले होते. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली होती. सरकारला नेमके सध्या काय करायचे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते की, राज ठाकरे यांना अनुसूचित जाती, जमातींचे खासदार वाढू द्यायचे नाहीत. राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यांना काही समजत नाही. राज ठाकरे यांना एससी, एसटी समाजाचे आमदार, खासदार नको आहेत. राज ठाकरे यांचा हाच वैचारिक डीएनए आहे. राज ठाकरे हे ओबीसींचे विरोधक आहेत. तसेच राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे महापालिका, टेंडरशी संबंधित आहेत. परंतु, राज ठाकरे हे संविधानाला चुकीचे दर्शवत आहेत. त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला होता. तसेच गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील रिक्षा व टॅक्सी चलकांना मराठी अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून देखील टीका केली होती. तेव्हा राज ठाकरेंनी सरकारच्या या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिला होता. त्यावेळी देखील मनसे कार्यकर्ते आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात घोषणाबाजी झाली होती. एकंदरीतच मागील काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ मनसैनिकांनी जालन्यात शाईफेक केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed