![]()
निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शंभराहून अधिक उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित नगरपालिकांनी उमेदवारांना अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या नोटीसनंतरही उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब सादर न केल्यास, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येतील. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी घोषित झाला होता. या तारखेपासून एका महिन्याच्या आत सर्व उमेदवारांना आपापल्या निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक होते. मात्र, शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या निवडणुकीत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट या १० नगरपालिका तसेच नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन नगरपंचायतींचा समावेश होता. यामध्ये एकूण १२ नगराध्यक्ष आणि २७८ नगरसेवक निवडून द्यायचे होते. नगराध्यक्षपदासाठी ६४, तर नगरसेवकपदासाठी १०४८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुसंख्य उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे, परंतु शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस बजावून एक आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत खर्च सादर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा नोटीस पाठवण्यात येतील. नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसनुसार उमेदवारांनी कार्यवाही न केल्यास, त्यांची माहिती थेट राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात येईल. जिल्हाधिकारी संबंधित उमेदवारांवर कारवाईची शिफारस करतील. या शिफारशीनुसार, राज्य निवडणूक आयोग संबंधित उमेदवारांना पुढील ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकते.
शंभरावर उमेदवारांना नोटीस: निवडणूक खर्च सादर न केल्याने कारवाई:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईची दिशा ठरणार
