गुणवत्ता वाढीसाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे 'स्कुल कनेक्ट' अभियान:मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेड्यात पहिला प्रयोग




श्री शिवाजी शिक्षण संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) जनजागृती आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘स्कुल कनेक्ट’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पहिला प्रयोग मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेडा (बुद्रुक) येथील शाळेत यशस्वीपणे पार पडला. महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि इंग्रजी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री शिवाजी हायस्कूल, भानखेडाचे मुख्याध्यापक सतीश पाटील प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सविता ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) तसेच गुणवत्ता वाढीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी NEP 2020 ची गरज, विद्यार्थ्यांना विषय निवडीसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि भविष्यातील व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना राऊत यांनी केले, तर आभार वऱ्हाडे यांनी मानले. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणात वक्त्यांचा परिचय करून दिला आणि अशा जनजागृती कार्यक्रमांची भविष्यात गरज असल्याचे अधोरेखित केले. मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्रजी विभागाच्या प्रीती जवंजाळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. शिक्षक राजूरकर, श्रीमती राऊत, जया ठाकरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी एक संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिप्राय सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, जिथे त्यांनी आपले विचार आणि मते मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *