विकास लवांडे नकली लोकांचे बुरखे फाडण्यात यशस्वी:त्यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय, सुषमा अंधारे यांनी केले कौतुक
![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. आज विकास लवांडे यांच्यासोबत जे काही आळंदीत घडले, ते एका अर्थाने त्यांचा विजयच आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात ते यशस्वी झालेत, असे त्यांनी म्हटले आहे. विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वा. ते परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विकास लवांडेंवरील हल्ला हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे म्हणाल्या, विकास लवांडे जी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..! कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले. आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झालात. वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले. आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलिस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा, चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे. उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे. त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया, असे त्यांनी म्हटले आहे. हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? – अमोल मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस (श.पवार साहेबांच्या) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? “कुण्याही जीवाचा न घडो मत्सर” व “जो जे वांछील तो ते लाहो” असे वैश्विक पसायदान मागणारे “तुकोबा ज्ञानोबा” अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत. निषेध, असे त्यांनी म्हटले आहे.
