राजकारणात काहीही होऊ शकते:महापौर पदाच्या निवडणुकीत पत्ते उघडू, इम्तियाज जलील यांचे सूचक विधान




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत 57 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी अवघ्या एका जागेची कमतरता भासत असल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे 33 जागा जिंकून एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी इतर सर्व पक्ष एकत्र येणार का आणि एमआयएम नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, 10 तारखेला होणाऱ्या महापौर निवडणुकीबाबत राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक विधान करत इम्तियाज जलील यांनी सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. तसेच 10 तारखेला पत्ते उघडू, असेही त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी एमआयएमने आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चुरस वाढली असून, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम चक्क शिवसेनेसोबतही जाण्याचा विचार करत असल्याचे संकेत इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. 10 तारखेला होणाऱ्या मतदानावेळी काहीतरी धक्कादायक घडण्याची शक्यता वर्तवत, जलील यांनी सध्या विविध पक्षांशी वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एमआयएमला पाठिंबा देऊन नवीन राजकीय समीकरण उभे करणार का, याबाबतचा सस्पेन्स आता अधिकच गडद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 115 जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 58 च्या आकड्यापासून भाजप (57 जागा) अवघ्या एका पाऊल अंतरावर असून, त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम (33), शिंदे यांची शिवसेना (13), ठाकरे यांची शिवसेना (6), वंचित (4), काँग्रेस (1) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (1) या सर्व विजातीय पक्षांना एकत्र येऊन 58 ही ‘मॅजिक फिगर’ गाठावी लागेल. तांत्रिकदृष्ट्या हे समीकरण शक्य असले तरी सध्याच्या राज्यातील महायुतीच्या राजकीय वास्तवामुळे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. मात्र राजकारणातील अनिश्चितता पाहता, भाजपला शह देण्यासाठी सर्व विरोधकांची ही अशक्यप्राय वाटणारी युती प्रत्यक्षात येणार का, याबाबतचे औत्सुक्य शिगेला पोहोचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *