मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात:पेट्रोल पंपांवर तुटवडा, वाहनधारकांची धावपळ सुरू; मालवाहतूकदारांचे टेन्शन वाढले

0
730-x-548-new-2026-05-09t102212583_1778302420.jpg




देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेल पुरवठ्याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्याचा परिणाम आता थेट पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे. काही भागांमध्ये डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मालवाहतूक, व्यावसायिक वाहने आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनधारकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असल्याने सामान्य चारचाकी वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मुंबईतील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात होत असल्याने वाहनांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. ट्रक चालक, मालवाहतूक करणारे व्यावसायिक आणि खासगी डिझेल वाहनधारकांना वेळेवर इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिझेल पुरवठा 5 ते 10 टक्क्यांनी घटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वाहतूक क्षेत्रात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांनी सध्या उद्योग क्षेत्राला डिझेल पुरवठ्यावर अधिक भर दिला आहे. अनेक कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांना नेहमीच्या कोट्यापेक्षा अधिक डिझेल पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांसाठी उपलब्ध होणाऱ्या डिझेलच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी मुंबईत इंधन वितरणावर परिणाम होत आहे. उद्योग क्षेत्राला वाढीव पुरवठा का केला जात आहे, यामागील नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. कारखाने, औद्योगिक यंत्रणा आणि व्यावसायिक प्रकल्प यांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. त्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून त्यांना ठरावीक कोटा दिला जातो. मात्र, मागील काही दिवसांत या कोट्यापेक्षा अधिक इंधन पुरवठा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील नियमित इंधन साखळीवर दबाव वाढला आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा कमी होत चालल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक खर्च वाढण्याचीही भीती या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेळेवर डिझेल न मिळाल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. त्याचा परिणाम बाजारपेठांमधील वस्तूंच्या वाहतुकीवर आणि उद्योगांच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. काही व्यावसायिकांनी डिझेल मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत असल्याची तक्रार केली आहे. जर ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर वाहतूक खर्च वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed