मुखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सरपंच बनण्याच्या हव्यासातून एका पित्याने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी मुलीचा पिता आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यमान सरपंचाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, केरूर गावातील पांडुरंग कोडामंगले (वय ३२) याला जुळ्या मुली झाल्या होत्या. त्यानंतर त्याला एक मुलगा झाला होता. गावातील चर्चांमधून आणि चुकीच्या माहितीमुळे त्याच्या मनात तीन अपत्य असल्यास सरपंच पदासाठी अपात्र ठरू शकतो, अशी भीती निर्माण झाली. प्रत्यक्षात, जुळ्या मुलांचा जन्म एका प्रसूतीत झाला असल्यास त्यांची गणना एकाच अपत्यामध्ये केली जाते, ही बाब त्याला माहिती नव्हती.
दरम्यान, केरूर गावचे सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पांडुरंगने सरपंच बनण्याचे स्वप्न पाहिले. अद्याप ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूकही जाहीर झाली नव्हती. मात्र, तीन अपत्यांचा नियम लागू होईल या भीतीमुळे त्याने एका मुलीला दत्तक देण्याचा प्रयत्न केला. जन्म प्रमाणपत्रात बदल करण्याचाही प्रयत्न झाला, मात्र त्यातही अपयश आले.
यानंतर विद्यमान सरपंच गणेश शिंदे (वय ३५) याच्यासोबत चर्चा करून एका मुलीला संपवून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानुसार, २९ जानेवारी रोजी पांडुरंगने पत्नीला नांदेडला जात असल्याचे सांगून सहा वर्षांची मुलगी प्राची हिला दुचाकीवर बसवून नेले. मात्र तो नांदेडला न जाता तेलंगणा राज्यातील येडापल्ली येथे गेला. तेथील तलावात प्राचीला फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाला.
३० जानेवारी रोजी तलावात एका बालिकेचा मृतदेह आढळून आला होता. या संदर्भात वास्तव न्यूज लाईव्हनेही बातमी प्रसिद्ध करून जनतेला ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. तपासादरम्यान तेलंगणा पोलिसांनी केरूर गावातून प्राचीचा पिता पांडुरंग कोडामंगले आणि विद्यमान सरपंच गणेश शिंदे यांना ताब्यात घेतले. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
पांडुरंग कोनामंगले याचे केरूर गावात केस कर्तनालयाचे दुकान असून, त्या ठिकाणी होणाऱ्या चर्चांमधूनच चुकीची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. या चुकीच्या समजुतीतून आणि सरपंच बनण्याच्या हव्यासातून त्याने स्वतःच्या मुलीचा जीव घेतल्याची बाब समोर आली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजात अज्ञान आणि चुकीच्या माहितीमुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे भयावह उदाहरण ठरले आहे.
