सांगोल्यात ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात:पोलिस भरतीसाठी निघालेल्या तरुणीचा अपघात, संधी हुकण्याच्या भीतीखाली असलेल्या तरुणीच्या मदतीला धावले कोल्हापूर पोलिस

0
new-project-2026-05-09t100625426_1778301429.jpg




कोल्हापूर पोलिस दलात भरती झाल्यानंतर वैद्यकिय प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथून जातांना प्रवासात अपघात झाला. आता नोकरीची संधी हुकणार यामुळे अडचणीत सापलेल्या भावी महिला पोलिस कर्मचाऱ्याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 9 संपर्क साधून तुझी संधी हुकणार नाही असा दिलासा दिला त्यांच्या या वाक्याने तरुणीला रडू कोसळले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने पोलिस दलातील शिपाई पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मैदानी चाचणी, लेखी परिक्षेनंतर भरती झालेल्या उमेदवारांना आज कोल्हापूर येथे आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी कोल्हापूर येथे सकाळी दहा वाजेपर्यंत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या भरतीमध्ये औंढा नागनाथ तालु्क्यातील पिंपळदरी येथील सागर रिठ्ठे हि तरुणी पोलिस दलात भरती झाली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे आलेल्या सागरच्या पोलिस दलातील भरतीमुळे तिच्या कुटुंबियाला आकाश ठेंगणे झाले होते. आता घरची परिस्थिती सुधारेल या अपेक्षेने रिठ्ठे कुटुंबिय आनंदीत होते. दरम्यान, कोल्हापूर पोलिस दलात आवश्‍यक कागदपत्रे देण्यासाठी सागर रिट्ठे हि शुक्रवारी ता. 8 रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरकडे निघाली होती. मात्र सांगोला गावाजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या अपघातात सागर हिच्या छातीला व पायाला मुक्कामार लागला. तिला तातडीने उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरु आहेत. मात्र आता सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर येथे कसे पोहोचणार याची चिंता तिला लागली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई, वडिलासमोर दुःखाचा डोंगरच उभा राहिला. त्यांनी सदर प्रकार पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांना सांगितला. परिस्थिती लक्षात घेता घोंगडे यांनी कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी तान्हाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सागर हिने पोलिस अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला सर्व घटना माहिती झाली आहे, तु फक्त तब्येतीची काळजी घे, कागदपत्रे जमा करण्यासाठी सोमवारी आली तरी चालेल, कुठलेही टेन्शन घेऊ नको असे सांगत दिलासा दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या दिलासामुळे सागर हिला रडूच कोसळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed