नगर परिषदेच्या वतीने 256 प्रगणकांना प्रशिक्षण:अचलपूर-परतवाडा शहरात जनगणनेची तयारी, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन‎

0
240_177824206069fdd20c75c0f_jangananaachal.jpg




भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने अचलपूर नगर परिषदेच्या वतीने अचलपूर-परतवाडा शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत व अचूक पार पाडण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २५६ प्रगणकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जात असल्याने प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन सुरू केले आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज प्रभाग क्रमांक ७ मध्ये जनगणनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी नगरसेविका अपर्णा जितेंद्र रोडे उपस्थित होत्या. प्रगणकांना नागरिकांशी संवाद कसा साधावा, माहिती संकलनाची प्रक्रिया कशी पार पाडावी तसेच डिजिटल प्रणालीचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे प्रगणकांना प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळाली असून जनगणना अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे. अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण जनगणना मोहीम राबवण्यात येणार आहे. ७ मे रोजी अचलपूर नगर नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या २५६ प्रगणकांनी स्वगणनेच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवली आहे. त्यांनी नागरिकांना जनगणनेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून शासनाच्या विविध योजना, विकासकामे, निधी वितरण आणि भविष्यातील नियोजनासाठी महत्त्वपूर्ण आधार असतो. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. या जनगणनेत दोन टप्प्यांमध्ये माहिती संकलन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे दरम्यान स्वगणना प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांना ३३ प्रश्न विचारण्यात येणार असून कुटुंबातील सदस्यांची माहिती, शिक्षण, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंदर्भातील माहिती नोंदवण्यात येणार आहे. नगर परिषद प्रशासनाने जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज केली असून नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed