![]()
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला. आज मला अजित पवारांची आठवण येत आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सगळे अजूनही धक्क्यात आहोत, आम्हाला अजूनही कळत नाहीये की हे झाले कसे? अजित पवारांवर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सरकारने केला होता. पण ते भारतीय जनता पक्षासोबत आले आणि पवित्र झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. … आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा मृत्यू झाला पुढे संजय राऊत म्हणाले, 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी एक वक्तव्य केले होते आणि भाजपला उद्देशून म्हटले होते की ‘माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करत असाल तर त्यातला पैसा फक्त आम्हीच नाही खाल्ला, भाजपने सुद्धा या घोटाळ्यात पैसा खाल्ला आहे आणि त्यांची फाइल सुद्धा माझ्याकडे आहे’. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी म्हटले होते आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मी आरोप करत नाहीये, पण हा मृत्यू संशयास्पद आहे. मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे नेहमी ती फाइल सोबत ठेवत होते. ते जेव्हा मुंबईहून निघाले होते, तेव्हा सुद्धा ती फाइल त्यांच्या सोबत होती. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू होतो. याची चौकशी झाली पाहिजे. आता तर मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली आहे. अजित पवारांचा मृत्यू पाहिल्यानंतर जस्टीस लोया यांची आठवण आली, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला झोडपून काढले. सोनम वांगचूक कुठे आहे? संजय राऊत यांनी संसदेत बोलताना सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार गैरजिम्मेदार आहे. लोकशाही या देशात आता राहिलेली नाही. न्यायालय असो किंवा निवडणूक आयोग या सरकारी कंपन्या बनल्या आहेत. सोनम वांगचूक कुठे आहे? त्यांचा अपराध काय आहे? त्यांनी सांगितले होते की आमची जमीन चीनने घेतली, तर त्यांना राष्ट्रद्रोही ठरवत तुरुंगात टाकले. कुठे आहे लोकशाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापलेली पुढे बोलताना संजय राऊत यांनी ‘मनरेगा’च्या मुद्द्यावरून टीका केली. मनरेगाचे नाव तर बदलले, पण रोजगार कुठून आणणार? शेतकऱ्यांना रोजगार मिळायचा, तो तुम्ही बंद केला. मराठवाड्यात 2025 साली 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापली आहे. देशभरातील भ्रष्टाचारी एकत्र आणतात आणि सरकार बनवतात, तोडतात. आधी नेत्यांना घडवले जायचे, आज नेत्यांना विकत घेतले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, उच्चस्तरीय चौकशी करा!:भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख करत संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
