स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकरला पाच दिवस पोलिस कोठडी:राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; आता वीरकर महाराज अडचणीत

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-08t09_1778298232.png




सोलापूर जिल्ह्यात भोंदूबाबांविरोधातील पोलिसांची कारवाई आणखी तीव्र झाली असून माढा तालुक्यातील आढेगाव येथील स्वयंघोषित गुरुमाऊली वीरकर याला अखेर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यवसायात प्रगती करून देतो, पैशांची भरभराट घडवतो, अशा प्रकारची आमिषे दाखवत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप वीरकर याच्यावर करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी त्याच्यासह त्याचा भाऊ विकास वीरकर यालाही अटक केली होती. या दोघांना माढा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सुरुवात पंढरपूर तालुक्यातील काही पीडितांच्या तक्रारीनंतर झाली. जादूटोणा, अंधश्रद्धा आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. पहाटेच्या सुमारास पोलिसांचे पथक आढेगाव येथील आश्रमात दाखल झाले आणि झोपेत असतानाच गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा भाऊ विकास वीरकर यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या संपूर्ण कारवाईदरम्यान मोठी खबरदारी घेतली होती. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरकर लोकांना भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत होते. काही भक्तांना विशेष जादूटोण्याचे प्रयोग करून व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून पैसे उकळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणताही फायदा झाला नाही. उलट अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. काही पीडितांनी लाखो रुपये गमावल्याचा दावा केला असून याच पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे गुरुमाऊली वीरकर याचे अनेक राजकीय नेते आणि काही प्रसिद्ध व्यक्तींशी असलेले संबंध. खासदार सुप्रिया सुळे, खासदार नीलेश लंके यांच्यासह विविध राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राज्यभर रंगली आहे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तपास केवळ फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणापुरताच मर्यादित असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर भोंदूबाबांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेविरोधातील कारवाईला वेग दरम्यान, पोलिस कोठडीत वीरकर आणि त्याच्या भावाकडून अधिक चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत आणखी किती लोकांची फसवणूक झाली, किती पैसे उकळले गेले आणि या प्रकरणात इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जाणार आहे. सध्या मनोहर भोसले प्रकरणानंतर दुसऱ्या भोंदूबाबावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेविरोधातील कारवाईला वेग आल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed