![]()
राज्यात आम्ही जेथे महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुका लढलो, तेथेच मित्रपक्षांना सत्तेत घेतले जाईल. जेथे स्वतंत्र लढलो, तेथे त्यांना सत्तेत घेणे म्हणजे आमच्या पक्षातील लोकांवर अन्याय होणार असल्याचे सांगत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत कोंडी केली. रविवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जेथे स्वतंत्र लढलो, तेथे कुबड्यांची गरजच नाही. आम्ही स्वबळावर ताकद दाखवून दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली होती. पालिकेतील 122 पैकी 72 जागा भाजपने स्वबळावर जिंकून पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. विरोधात लढणाऱ्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 26 आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) चार नगरसेवक निवडून आले. केंद्र व राज्यात तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेतसुद्धा भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्र काम करावे, अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मांडली होती. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीने ‘पटेल ऐवजी पाटील’ यांच्यावर अध्यक्षाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले. यावर महाजन म्हणाले, ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. नाशिकमधील त्यांचा एकमेव नगरसेवक आमच्याकडे येण्यास तयार असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना अवाक केले. नाशिकमध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही. भाजपचे 72 नगरसेवक निवडून आले असून त्याच्यात महत्वाची पदे वाटली जातील, असे संकेत महाजन यांनी दिले. नाशिक महापौर मुंबईत ठरवणार गिरीश महाजन म्हणाले की, भाजप सरकाने 11 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे देशाची प्रगती झाली असून आपण आता एक्स्पोर्टर झालो आहोत. 2047 मध्ये आपला देश आर्थिक महासत्ता असेल. नाशिकमध्ये महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील 40 पैकी 10 नगरसेविका आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय होणार आहे. महापालिका निवडणूकीत भाजपने 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी जाहीर झाल्याने भाजपच्या 40 पैकी 16 महिला या पदासाठी पात्र आहेत. पत्रकार परिषदेनंतर मंत्री महाजन यांना महापौरपदाबाबत विचारले असता या पदासाठी 10 महिला आग्रही असल्याचे सांगत यावरर मुंबईत निर्णय होईल,असे स्पष्ट केले.
स्वतंत्र लढलो तिथे सत्तेमध्ये वाटा नाही, नाशकात महाजनांकडून शिंदेसेनेची कोंडी:मित्रपक्षाला स्थान म्हणजे स्वपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याची भूमिका
