हर्सूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी खेळला खो खो:'मी आयुक्त होणार' उपक्रमांतर्गत साधला संवाद

0
ef446f69-620e-4eb7-834f-78a2e02794d9_1769931453420.jpg




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या ‘मी आयुक्त होणार’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मनपा प्राथमिक शाळा, हर्सूल वसाहत येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या ‘जलश्री’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या बंगल्यावर खो-खोसह विविध खेळ खेळले. या भेटीदरम्यान, शाळेतील विद्यार्थिनी विविध नृत्ये सादर करण्यासाठी वेशभूषेत आल्या होत्या. सकाळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी खो-खो खेळण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन मुलींनी ‘स्वागतम’ या गाण्यावर नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले. मुलींनी ‘ढोलना’ आणि ‘मोबाईल बुरी बला है’ यांसारख्या गाण्यांवर आधारित विविध नाटके व नृत्ये सादर केली. आयुक्तांच्या मुलीही ही नृत्ये पाहून प्रभावित झाल्या आणि त्यांनी विद्यार्थिनींना शाबासकी दिली. यानंतर आयुक्त आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी संवाद सुरू झाला. संवादादरम्यान आयुक्तांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेसाठी काय हवे आहे आणि मोठे झाल्यावर त्यांना काय व्हायचे आहे, असे विचारले. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी खेळाचे साहित्य हवे असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी आवश्यक साहित्याची यादी देण्यास सांगितले आणि ते सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मोठे झाल्यावर कोणी आयुक्त, कोणी खेळाडू, कोणी नाटककार तर कोणी नृत्यांगना बनण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावर आयुक्तांनी त्यांना आवडेल ते होण्याचे आवाहन करत, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, असा सल्ला दिला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना हर्सूल तलावातून येणारे पाणी आणि जमिनीखाली असलेली निजामकालीन पाण्याची टाकी दाखवण्यात आली. पाण्याचा जपून वापर करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी पाणी वाया न घालवण्याची प्रतिज्ञा घेतली. सदर भेटीचे आयोजन उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे आणि नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे आणि कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी सुधाकर वानखडे, रामेश्वर बोराडे, माधवी मोरे, दीपाली म्हस्के आणि दीपाली बागल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed