अर्धापूर पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्याकडे; जबाबदारीच्या जाणीवेतून कार्याला सुरुवात


अर्धापूर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्याकडे सोपवली आहे. मांजरमकर यांनी आज सकाळी आपला पदभार स्वीकारला असून, एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे ही धुरा आल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

महादेव मांजरमकर यांच्यासाठी अर्धापूर परिसर नवीन नाही. यापूर्वी त्यांनी नांदेड जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले असून, अर्धापूर पोलीस ठाण्याचा प्रभार तब्बल दहा महिने यशस्वीरीत्या सांभाळला आहे. परिसरातील गुन्हेगारीची परिस्थिती आणि भौगोलिक व्याप्तीची त्यांना पूर्ण माहिती असल्यानेच, डॉ. नीलाभ रोहन यांनी त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून ही नियुक्ती केली आहे.

अर्धापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांची पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती होऊन त्यांची बदली किनवट उपविभागात झाल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेवर आता मांजरमकर यांची नियुक्ती झाली आहे. जो महादेव आहे, तो सर्व पाहून घेईल या विश्वासाने प्रशासनाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असून, वरिष्ठांची ही अपेक्षा सार्थ ठरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मांजरमकर यांनी पदभार स्वीकारताना सूचित केले. जबाबदारीची जाणीव आणि जनसामान्यांच्या सुरक्षिततेचा ध्यास घेऊन त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे.


Post Views: 139






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *