धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेऊ- सुनील तटकरे:जुळून आल्यास उद्याच शपथविधी, उपमुख्यमंत्री पदाबाबत छगन भुजबळांचे सूचक विधान




राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच उपमुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सुनेत्रा पवार यांची निवड अजित पवारांच्या पदावर करण्यात यावी. त्यानुसार राजकीय वर्तुळात हालचाली देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून उपमुख्यमंत्री पदाबाबत धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच्या उद्या सुनील तटकरे म्हणाले, दादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून आम्ही कोणीही सावरलो नाहीये. आम्हाला अजूनही असे वाटते की दादा आमच्यातच आहेत. या शोकमग्न अवस्थेतच आम्ही आहोत. आज अजितदादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. या कार्यालयात त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले, इथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे यासाठी मी कार्यालयात आलो. याच भावनेने मी आलो होतो. धार्मिक विधी झाल्यानंतर ठरवू पुढे बोलताना सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे. शो मस्ट गो ऑन- छगन भुजबळ यासंदर्भात छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार गेले आणि ज्या पद्धतीने गेले आहेत, त्यामुळे झोप उडाल्यासारखी झाली आहे. पण आता असे आहे की शेवटी ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हणतात, त्यामुळे कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवले पाहिजे, पक्ष असेल सरकार असेल. उद्या मला असे वाटते की जे विधानमंडळातले जे नेते आहेत आमचे, त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पक्षाचे प्रमुख पद जे अजितदादांकडे होते, ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच्या उद्या शपथविधी होईल छगन भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत मला फारसे माहित नाही. पण आता सध्या ही राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची, यात जे काही कामे आहेत, त्याकडे आपण लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्री पद रिकामे आहे, ते पद सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून कसे भरता येईल त्यावर आमचे जास्त लक्ष आहे. बाकीचे पुढे बघता येईल. लोक जसे ठरवतील त्यानुसार निर्णय घेता येईल. उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर, उद्याच्या उद्या शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान भुजबळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *