ठाण्यात शिंदेसेनेचा झेंडा:ठाण्याचे महापौरपद शिवसेनेकडेच, भाजपला उपमहापौरपद समाधान मानावे लागले; शर्मिला पिंपळोलकर ठाण्याच्या प्रथम नागरिक




ठाणे महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे राजकीय गणित अखेर अंतिम टप्प्यात आले असून, महापौरपदावर शिवसेना शिंदे गटाचाच दावा निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने ठाण्याच्या राजकारणात सकाळपासूनच प्रचंड हालचाल आणि उत्सुकता पाहायला मिळाली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर अखेर शिवसेनेकडून महापौरपदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्याच्या सत्ताकारणात शिंदेसेनेचे वर्चस्व आणखी ठळक झाले आहे. महापौरपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विमल भोईर, शर्मिला पिंपळोलकर आणि डॉ. दर्शन जानकर हे महापौरपदाचे प्रमुख दावेदार उपस्थित होते. बराच वेळ चर्चा आणि अंतर्गत मतमतांतरे मांडल्यानंतर अखेर नेतृत्वाने निर्णय घेत शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाला अंतिम मंजुरी दिले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संख्याबळ, अनुभव आणि स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतलेला भाजप आता सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार झाल्याचे चित्र आहे. महापौरपदावर दावा सोडत भाजपने उपमहापौरपदावर समाधान मान्य केले. भाजपकडून कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ठाण्यातील सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. महापौरपद मिळणार नसले तरी सत्तेत सहभाग ठेवण्यासाठी भाजपने ही तडजोड स्वीकारल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेला 75 तर भाजपला 28 जागा मिळाल्या आहेत. या संख्याबळाच्या जोरावर शिंदेसेनेने भाजपला दोन वर्षे तर सोडाच, एक वर्षही महापौरपद देणार नसल्याची भूमिका स्थानिक पातळीवर स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपने सुरुवातीला अडीच वर्षांचा महापौरपदाचा आग्रह धरला होता, मात्र शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे अखेर भाजपला मागे हटावे लागले. त्यामुळे ठाण्यात महापौरपद शिवसेनेकडे गेले आहे. महापौरपद हुकल्याने भाजपने महापालिकेतील इतर सत्ताकेंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थायी समिती, परिवहन समिती, विविध विषय समित्या, प्रभाग समित्या आणि शिक्षण मंडळावर भाजपने दावा ठोकला आहे. शिंदेसेनेकडून भाजपला उपमहापौरपद स्वीकारण्याचा तसेच विषय आणि प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद तीन व दोन वर्षे अशा कालावधीत दोन्ही पक्षांमध्ये विभागून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रस्तावावर दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचेही संकेत आहेत. एकूणच, ठाणे महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा तिढा सुटत असून, शिंदेसेनेचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येत आहे. महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून, उपमहापौरपदी भाजपकडून कृष्णा पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज सत्तास्थापनेवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे आता स्थिरावण्याच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *