Diwali Lantern

1 सप्टेंबरला मुंबईत ओबीसींचे राज्यव्यापी आंदोलन:आरक्षणाच्या प्रश्नावर लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा




पुण्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर, येत्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, अॅड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरकार, ओबीसी मंत्री आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात झुंडशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात आहे. “आम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिरावे लागते; आम्ही दहशतवादी आहोत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 1 सप्टेंबरचे आंदोलन हे ओबीसी समाजाचे शेवटचे आंदोलन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अॅड. मंगेश ससाणे यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, “22 लाख प्रमाणपत्रांपैकी केवळ चार प्रमाणपत्रे रद्द झाली, तरीही मनोज जरांगे आंदोलन करत आहेत.” या आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर वैयक्तिक टीका केली. त्यांनी जरांगे यांचा “कुपोषित बाळ” असा उल्लेख केला. तसेच, पत्रकार परिषदेत प्रसाद लाड यांच्याकडून जरांगे यांना मदत पुरवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. भाजपला ओबीसी समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल दुःख व्यक्त करत हाके यांनी राज्यातील नऊ ओबीसी मंत्र्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देत त्यांनी ओबीसी समाजाला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳