साताऱ्यात बिबट्याचा थरार:घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला, उपचारापूर्वीच मृत्यू




सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या 2 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जय संदीप खंडागळे असे मृत बालकाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या जयला बिबट्याने अचानक उचलून नेले. ग्रामस्थांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. लोकांचा गोंधळ वाढल्यानंतर बिबट्याने बालकाला सोडून दिले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या जयचा मृत्यू झाला. सातारा तालुक्यातील शिवथर आणि मालगाव या दोन गावांच्या दरम्यान न्हाळेवाडी गाव आहे. या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जात आहे. बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण होते. त्यातच रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. अशाच परिस्थितीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास जय संदीप खंडागळे हा दोन वर्षांचा बालक घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधाराचा फायदा घेत बिबट्याने अचानक जयवर झडप घातली आणि त्याला उचलून नेले. बिबट्याने बालकाला घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेताच्या दिशेने नेले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरडाओरड करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. मोठ्या संख्येने नागरिक पाठलाग करत असल्याने निर्माण झालेल्या गोंधळामुळे बिबट्या बालकाला सोडून तेथून पळून गेला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला होता. ग्रामस्थांनी त्याला तातडीने बाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, न्हाळेवाडीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप न्हाळेवाडी, शिवथर, कोलवडी आणि मालगाव परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्याचे सांगितले जात आहे. बिबट्याच्या वावराबाबत वारंवार सूचना करूनही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुरेशा उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता वनविभागाच्या कारभाराबाबतही ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बिबट्याचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांची माहिती सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, जय खंडागळे हा दोन वर्षांचा बालक घराबाहेर खेळत होता. त्यावेळी बिबट्याने त्याला पकडून नेले. ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केल्यानंतर लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या पळून गेला आणि बालक तेथे सापडले. बालकाला तातडीने सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी यापूर्वी बिबट्याच्या वावराबाबत तक्रारी केल्या होत्या, हे बरोबर असल्याचेही पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी सातपुते यांच्याशी चर्चा झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शशिकांत शिंदेंकडून दुःख व्यक्त या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही दुःख व्यक्त केले. न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या 26 महिन्यांच्या जय संदीप खंडागळे याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. खंडागळे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत, या कठीण प्रसंगी शासनाने कुटुंबाला तातडीने आवश्यक मदत जाहीर करावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने अधिक प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सातारा तालुका पंचायत समितीचे सदस्य राजेश मोहन पवार हेही घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. न्हाळेवाडीतील या घटनेमुळे परिसरात बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वनविभाग आता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती पावले उचलतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… उल्हासनगरमध्ये महायुतीतील संघर्ष चिघळला:भाजपचा युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, शिवसेनेचे प्रत्युत्तर उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद अधिकच चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेत उल्हासनगरमध्ये युतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढील कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *